Sunday, September 13, 2009

उद्योग बंगला

"नेहमी नेहमी काय कोल्हापूर? पुण्याबद्दल लिही की काहीतरी!"- इति आई! पण पुण्यातल्या छान आठवणी लिहायल्या घेतल्या तर अजून एक उन्हाळ्याची सुट्टी तयार होईल! पुण्यातलं माझं लहानपण फार वेगळं होतं. आम्ही शुक्रवार पेठेत एका मोठ्या बंगल्याच्या तळमजल्यावर भाडेकरू म्हणून राहात होतो खूप वर्ष. त्या बंगल्याचं नाव "उद्योग" होतं. त्यामुळे ते नाव पुढे नेत मी उद्योगी झाले. त्या घराच्या आजूबाजूला छान बगीचा होता, अंगण होतं आणि अंगणात छोटासा हौद होता. माझी आई त्या हौदावर डाळी वाळत घालायची. एकदा कुठल्याशा बालिश खेळात मी तिने वाळत ठेवलेली सगळी डाळ हौदात सारली होती. तसं मी का केलं असेल याचं कारण मला आजही माहीत नाही. पण अशा अनेक उद्योगांनी मी आईला हैराण करत असे! एका अशाच निरागस रविवारी दुपारी मी सर्फचा अख्खा पुडा डोक्यावर ओतला आणि नळाखाली उभी राहिले. जेव्हा फेस सीमेपार गेला तेव्हा मात्र घाबरून आईला झोपेतून उठवायला तिच्या खोलीत माझ्या आकाराचा फेसाचा ढग गेला. बाहुल्यांचे केस कापायची मला फार आवड होती. पण माझ्यासारखे त्यांचे केस परत उगवत नाहीत हे कळेपर्यंत ब-याच बाहुल्यांचे बळी गेले!
उद्योग बंगल्यात फक्त मीच उद्योजिका होते. माझी आई अजून उद्योजिका झाली नव्हती. त्यामुळे नुकती लग्न झालेली, कोल्हापुरातून पुण्याला आलेली माझी आई खूप खूप साधी होती. तशी ती अजूनही तशीच आहे. पण तेव्हा ती सगळे रविवार माझ्यासाठी कपडे शिवण्यात घालवायची. त्यात तिची सगळी कला-कुसर दिसायची. कॅम्पमध्ये जाऊन ती सुंदर लेस, तलम कापड, छान छान बटणं घेऊन यायची आणि मग सगळी दुपार तिच्या छोट्या मशीनवर माझ्यासाठी कपडे शिवायची. कापड उरलं तर माझ्या बाहुलीलाही तसेच कपडे शिवायची. माझ्या वर्गातल्या सगळया मुलींमध्ये सगळ्यात सुंदर आणि कल्पक कपडे माझे असायचे.
आई सोमवारी ऑफिसला जाऊ लागली की मी रडून तिच्यासमोर लोटांगण घालायचे. रविवारचा अख्खा दिवस तिच्या आजूबाजूला बागडत घालवल्यावर सोमवार मला अगदीच रूक्ष वाटायचा. मग मी रविवारी संध्याकाळी तिला म्हणायचे,"आई तू उद्या जाऊ नकोस कामाला. उद्याच्या दिवस आपण गरीब-गरीब राहू." तशी आई खुदकन हसायची. पण सोमवारी माझ्या या प्रतिभावंत वाक्याचा काही उपयोग व्हायचा नाही.
आमच्या पुण्याच्या घरात पण झोपाळा होता. त्यावर मी व बाबा बसून खूप गाणी म्हणायचो. बाबा पण माझ्याबरोबर गाणं शिकायला यायचा. त्यामुळे तो माझ्याकडून कधी कधी झोपाळ्यावर "रियाज" करून घेत असे. कधी कधी रविवारी आई चिकन बनवायची. मग सकाळपासून मी तिच्या आजूबाजूला मांजरीसारखी घुटमळायचे.
"चिकन झालं?"
हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून तिला भंडावून सोडायचे.
पण रविवारचा सगळ्यात सुंदर उपक्रम म्हणजे सकाळी सकाळी पर्वतीवर जाणे. मी, आई आणि बाबा लवकर उठून पर्वती चढायचो. तिथे वरती पारिजातकाचं झाड होतं. त्याची फुलं वेचून ती नंदीवर वाहायला मला फार आवडत असे. खूप लवकर गेलं की तो सडा अजून कुणीच पाहिला नसायचा. त्यामुळे तशा पारिजातकाची फुलं वेचण्यात वेगळीच मजा असे. बाबा खूप वेळा पर्वती चढायचा. मग मी आणि आई त्याची वाट बघत बसायचो. त्याचं झालं की मिळून खाली यायचो. मग पॅटीस आणि क्रीमरोल घ्यायचो. तसं बघायला गेलं तर ही अगदी साधी रविवार सकाळ आहे. पण आता उगीचच ती साधी सकाळसुद्धा खूप महत्वाची वाटते! आई तेव्हा जशी होती तशी ती आता नाही, बाबा पण नाही आणि मी ही! त्यामुळेच कदाचित त्या सकाळी आता खूप मौल्यवान वाटतात!
आमच्या शेजारी चित्रे आजोबा-आजी रहायचे. मी त्यांच्या घरात हळू हळू शिरकाव केला आणि नंतर त्यांच्यातलीच एक झाले. चित्रे आजोबा माझे सवंगडी होते. त्यांच्यामुळे मला कधीच मित्र-मैत्रिणींची कमी भासली नाही. ते माझ्याबरोबर भातुकलीपासून रंगपंचमीपर्यंत सगळे खेळ खेळायचे. त्यांच्या बिचा-या चार केसांच्या वेण्या घातल्याचेही माझ्या लक्षात आहे! त्यांच्या घरी जेवायला मला खूप आवडायचे. आईला मात्र या गोष्टीचा फार संकोच वाटायचा. त्यामुळे सकाळी ती माझ्या नकळत भाजी-पोळी त्यांच्याकडे ठेवायची, त्या नको म्हणत असतानासुद्धा. पण जेवायला बसलं की मला माझ्या आईचा स्वैपाक लगेच ओळखू यायचा. त्यामुळे बरेच दिवस माझ्या आईला "माझ्या पोरीला माझा स्वैपाक आवडत नाही" या गोष्टीचा खूप त्रास झाला. एरवी अन्नपूर्णेनंतर पहिलं नाव तिचं घेतलं जातं. त्यामुळे हा आघात तिने तसा अध्यात्मिकतेने घेतला असावा.
आमच्या घरासमोर व्हरांडा होता. त्याला लागून तीन पाय-या होत्या. संध्याकाळी सहा वाजता मी व चित्रे बाबा त्या पाय-यांवर आईची वाट बघायचो. मग कोप-यावर आईची एका बाजूला झुकलेली मान दिसायची. मी लगेच गेटकडे धाव घ्यायचे. मला आईवर माकडासारखी उडी मारताना बघून रोज चित्रे बाबांच्या डोळ्यात तस्सच हासू येत असे. आई घरी आली की चित्रे बाबा हळूच त्यांच्या घरी परत जायचे. मला मात्र आई आल्याच्या आनंदात ते कधीच जाणवले नाही.
आशी किती माणसं हळूच आली आणि हळूच गेलीही! कधी कायमची तर कधी मोठ्या माणसांच्या भांडाभांडीत. कधी गाव बदलला, तर कधी देश. कधी माझ्याच जुन्या कपड्यांमध्ये मी मावेनाशी झाले. पण जाणारी प्रत्येक व्यक्ती एक खण करून जाते. आणि मग एक दिवस अचानक आपल्या हातात खूप रंगीबेरंगी खणाच्या बांगड्या आहेत असं लक्षात येतं!
अशीच ही एक बांगडी, पुण्याची!

14 comments:

 1. सई,
  नेहमीप्रमाणे एक सुंदर लेख.

  खूपच हळवा होतोय ग हे लेख वाचून. कॅलिडोस्कोप बघितल्यासारख जुन्या आठवणी दाटून येतात अन डोळ्यातून बाहेर पडतात.

  अनिकेत वैद्य.

  ReplyDelete
 2. सई मी देखील खूप हळवा झालो घे वाचून.माझ्या आयुष्यातले सगळ्यात सूंदर दिवस उद्योग बंगल्यातले होते. आपले सगळ्यांचेच!

  ReplyDelete
 3. उस्ताद, अनिकेत आणि बाबा
  धन्यवाद! :)
  पुन्हा भेटू!!

  ReplyDelete
 4. सई, तुझा blog उघडताना मला नेहमी जुन्या फोटोंचा अल्बम उघडताना येतो तसा फील येतो. आता जणू चाळाच लागलाय , नेटवर बसलो की आधी तुझा blog उघडून बघायचा.. का कुणास ठाउक, तुझे blog मला black and white फोटोसारखे वाटतात. म्हणजे फक्त विषयावर focus असतो, बाकी सगळं backgroundला!!

  ReplyDelete
 5. मला उद्योग बंगला हे नावच ज्याम आवडलं :)

  ReplyDelete
 6. Saee, Just wonderful...Tu kupach chaan lihites..

  ReplyDelete
 7. Prasad, Sakhi Ani Snehal
  Khup khup abhar. :)
  I was actually not so motivated to write on this blog after my ajji's death. But my parents and all your comments inspire me. :)
  Will write a new one soon.
  Cheers
  Saee

  ReplyDelete
 8. May her soul rest in peace.
  Show must go on.keep writting..

  ReplyDelete
 9. Khupach sunder blogs...
  Junya athwani tajya zalya..
  Udyog bangala shukrawar pethet kuthe ahe?
  Me shukrawar pethetch rahate...

  ReplyDelete
 10. Hi Leena
  Udyog Bangla is no more. :(
  Just like some of the characters in this blog.
  It was near hotel Peacock. Very close to Heerabag Ganpati.
  We left that place in 1990. It was demolished for an apartment complex. :(

  ReplyDelete
 11. सई,
  तुझा ब्लोग वचुन मी ही भूतकाळात गेले.. खूप वर्श झाली आता.. मलाही तुमचा उद्द्योग बगला आटवतो.. मी ही खूप लहान होते तेव्हा..मला अगादि छोटि तीन चाकी सायकल चलवनरि सई आटवते.मला तेव्हा तूला कडेवर घ्यायची खूप हौस असयची.. पण तूला विषेष आवडायचे नाही. तू आणि शिरिष काका बन्गालि गाणी म्हणायचा तेहि अजुन आटवते..काकूच्या हातचि कोशिबिर हि आटवते..लहानपणचे दिवस किति छान असतात नहि..

  ReplyDelete
 12. Hey Gandhali Tai!! =)
  Thanks for the comments. :)
  I remember not being fond of being picked up and not a being a fan of "galguchha" either. :)
  I will write more.
  Cheers
  Saee

  ReplyDelete
 13. ohho tu phaarch udyogee hotees :) arthat ha hi lekh nehmeepramanee chaanCH zaalay pan nust chaan naahi kahitaree phaar kholvar lihilys tu...

  mala aathvty maze lahan bahin hi aaikade officla jau nakos asa hatt karaaychee :) maybe mubai chya ghdyalaychaya kaatanvar palta palta aaila kadhe thaambtach aal naahi. This is very This is very touching write-up!!

  ReplyDelete