Friday, October 2, 2009

संध्याकाळ

खूप दिवसांपासून तुम्हांला सगळ्यांना मला मुडशिंगीला न्यायचंय. पण तिकडच्या रस्त्यावर माझे विचार गेले की त्यांना वाटेत ब-याच इतर आठवणी भेटतात. त्यामुळे पुढे जायच्या ऐवजी त्यांच्याच गोष्टी तयार होतात. तसं करत बसलो तर मुडशिंगीला पोहोचायला फार उशीर होईल.

मुडशिंगी, म्हणजे गडमुडशिंगी आमच्या कोल्हापूरच्या घरापासून बरोब्बर सात किलोमीटर दूर आहे. पण तिकडे गेल्यावर आपण दुस-याच कुठल्यातरी जगात आलोय असं वाटतं! तशा मुडशिंगीला जायच्या खूप पद्धती होत्या. नरूमामाच्या स्कूटरवरून जाण्यात आम्हांला सगळ्यात जास्त मजा यायची. मी व स्नेहा दोघी त्यावर मावायचो. पण मीनामामी असेल तर बसनी जावं लागायचं. मग आधी ती तयार व्हायची. कारण तिकडे बाकीच्या दोन माम्या होत्या ना! मग मीनामामी छान साडी नेसायची. पावडर-कुंकू (हा शब्द खास कोल्हापुरातच वापरतात) करून मी, स्नेहा व मामी निघायचो. त्यात अज्जीच्या सूचना सुरू असायच्या, "मुल्लींनो, मळ्याकडं गेलात तर विहिरीपाशी जाऊ नका बरंका!".
कमला कॉलेजच्या समोरच्या बस स्टॉपवर आमची बस यायची. त्या स्टॉपच्या पाठीमागे एक खूप जुना बंगला होता दगडी. मग मी आणि स्नेहा त्या बंगल्यात कशी भुतं राहात असणार याच्या कथा रचायचो फावल्या वेळात. लहानपणी आपली गोष्ट दुस-यापेक्षा जास्त चमत्कारिक असावी यासाठी काहीही गोष्टी बनवायची हौस होती मला. त्यामुळे माझ्या भुताच्या गोष्टी फार विनोदी असायच्या. माझी भुतं रात्री लहान मुलांसाठी आईस्क्रीम विकायची!

मग थोडावेळ वाट बघितली की के.एम.टी यायची. मी पुण्याच्या पी.एम.टी चं अजून दर्शन घेतलं नाही, पण कोल्हापुरात मात्र मी नेहमी बसनी प्रवास करायचे. बसमध्ये चढलं की ही बस मुडशिंगीला जाणार यात काही वादच उरायचा नाही. कारण बसमध्ये सगळे, "काय मीनावैनी!" म्हणून ख्यालीखुशाली विचारायला लागायचे.
"वसुची व्हय?"
"होय."
"चांगली गुटगुटीत झाली की आता!" (’गुटगुटीत’ पासून ते ’अंगानी जरा ज्यास्त’ पर्यंतचा प्रवास मी बरेच मूग गिळून केला होता.)
"ताईस्नी भेटायला चालला व्हंय?"
"होय. म्हंटलं मुलींना जरा घेऊन जावं."
मग अख्खा रस्ता घडघडण-या बसमधून बाहेर बघण्यात जायचा. दहा मिनिटांतच गडमुडशिंगी पंचायतीची कमान यायची. त्यातून आत गेलं की आधी हिराक्काचं घर दिसायचं. तिच्या घराला लागूनच आमचं कुंपण होतं. तिचं घर छोटंसं तर आमच्या घराला मात्र चांगलं मोठ्ठ दगडी फाटक आहे. त्यावर आजोबांचं नाव दगडावरच्या रेषेसारखं लिहिलं आहे!
घराच्या शेजारीच बस थांबते. उतरल्या उतरल्या सगळे, "वसूची काय?" असा प्रश्न विचारायचे. घराच्या अंगणापलीकडे राजामामाचं रेशनचं दुकान आहे. तिथे सगळ्या गावातल्या बायका रॉकेलच्या रांगेत उभ्या असायच्या. आम्हांला बघून त्यांना फार आनंद व्हायचा!
ताजीला आम्ही येणार हे माहीत असायचं. मग ती अंगणातच कुणाशीतरी गप्पा मारत उभी असायची. आमच्याकडे जेव्हा फोन नव्हता तेव्हा मामी गवळ्याबरोबर निरोप पाठवायची. मग ताजीला बघितल्यावर मी व स्नेहा पळत जाऊन तिला घट्ट मिठी मारायचो. हिराक्का कुंपणापलीकडून, "सई आली व्हय?" अशी लगेच पृच्छा करायची. ती ताईशी नेहमी कानडीत बोलायची. ताजीच्या माहेरी सगळे कानडी बोलतात. मग मी ताजीला मधे मधे , " अत्ता ती काय म्हणाली?" असे प्रश्न विचारायचे. आमच्या अंगणात पाण्याचा पंप होता. तिथे ताजीच्या "खास" मैत्रिणी धुणं धुवायला यायच्या. हिराक्का तिची खास होती. मग तिचं धुणं चालू असताना माझी एकसारखी बडबड चालू असायची. कुणी खेळायला नसेल, तर मी स्वत:शी बोलायचे! त्यामुळे हिराक्काचं, "वसुची पोरगी लईऽऽऽऽ बडबडती" हे वाक्य अजरामर झालं होतं.
मुडशिंगीच्या घरातसुद्धा झोपाळा आहे. अंगण, पडवी, मग तीन खोल्या, झोपाळ्याची खोली, स्वैयंपाकघर, देवघर, मागे हौद आणि मग परसात छोटीशी बाग! त्या बागेतूनच हिराक्का आणि ताजीच्या गप्पा रंगत असत. बागेच्या एका कोप-यात चूल होती. त्यावर अंघोळीचं पाणी तापायचं. त्या पाण्याला इतका सुंदर सरणाचा वास यायचा की मला साबण लावायला सुद्धा आवडायचे नाही. ताजीच्या खोलीत दोन पलंग होते. तिच्या खोलीला बाहेर उघडणारं एक वेगळं दार होतं. त्या दारात तिनी सुंदर वेल चढवला होता. पावसाळ्यात त्या वेलावर चांदण्यांसारखी फुलं यायची आणि पावसाच्या त्या थंड श्वासामध्ये मिसळून त्यांचा सुगंध संपूर्ण घरात दरवळायचा. कुसुमअज्जीसुद्धा ताजीच्या या वेलावर भाळली होती. पण त्या दोघींच्यात मात्र कधी रुक्मिणी आणि सत्यभामेचा प्रश्न उद्भवला नाही. कारण कदाचित त्यांचं कृष्णापेक्षा पारिजातकावरच जास्त प्रेम होतं!
अरूमामा म्हणजे माझा थोरला मामा. त्याची बायको सुरेखामामी. तिच्या हातची गरम भाकरी आणि भरल्या वांग्याची भाजी मिळायची! तिच्या भाकरी जादुई असतात. इतकी पातळ आणि गोल भाकरी मी अजून कुठेच बघितली नाहीये. मुडशिंगीत मी सगळ्या भुकेच्या वेळांना दही, ठेचा आणि भाकरी खाते. राजामामाची बायको मधूमामी मला हवा तेव्हा, हवा तेवढा चहा करून द्यायची. दुपारी सगळे झोपले की मी व स्नेहा राजामामाच्या दुकानात जायचो. मग तो सांगेल तशी साखर, गहू मोजून लोकांच्या पिशव्यांमध्ये घालायचो. त्याबद्दल तो लगेच आम्हाला पगार द्यायचा. मी पोत्यांतले कच्चे गहू खायचे. कच्चा गहू थोड्या वेळानी चुईंगम सारखा होतो.
मग उन्हं उतरली की अरूमामा चहा प्यायचा आणि मग आम्हांला मळ्याकडं घेऊन जायचा. ताजी त्याला आम्हांला तिन्हीसांजेच्या आत घरी आणायची सूचना करायची लगेच. त्यावेळी म्हणे दृष्ट, बाधा अशा गोष्टी प्रबळ होतात. त्यावर माझा विश्वास नाही. पण कधी कधी त्या संध्याकाळच्या वेळी उगीच उदास वाटतं हे मला अनुभवानी कळू लागलं!
मामाच्या मळ्यात नेहमी ऊस असायचा. मग ऊस काढून मळा दमला की हरबरा लावायचा. कधी गुलाब असायचे तर कधी वांगी. कधी खास तिखट मिरची. हल्ली हल्ली मामानी केळीची बाग केली आहे. तिथे दुपारी जाऊन झोपण्यात जे सुख आहे ते दुस-या कुठल्याही गोष्टीत नाही. मळ्याच्या मध्यभागी एक छोटी खोली आहे आणि त्याला जोडून गोठा आहे. मामा खूप वेळा त्या खोलीत ताणून देतो. पलिकडच्या खोलीत एक जोडपं राहतं. त्यांच्या छोट्या मुली इकडे तिकडे उड्या मारत असतात.

त्या खोलीला लागूनच आमची सुप्रसिद्ध विहीर आहे. त्या विहिरीवर एका मोठ्या चिंचेच्या झाडानी स्वत:चं अंग टाकलं आहे. त्याच्या फांद्यांवर सुग्रणींची खूप बि-हाडं आहेत. ती बघायला मला फार आवडायचं. कधी कधी मामा माझ्यासाठी पिलं उडून गेलेलं घरटं आणायचा. ते मी पुण्याला घेऊन यायचे. माझ्या वर्गातल्या कुणीच तसं घरटं बघितलेलं नसायचं. पण त्या झाडाच्या चिंचा मात्र आमच्या नशिबात नव्हत्या. पण आम्ही चिंचेची पानं खायचो मग!
कधी कधी मजा म्हणून मामा मला शेतात वांगी तोडायला पाठवायचा. मग सगळ्या बायका माझ्याकडे अगदी कौतुकाने बाघायच्या. मला वेगळी टोपली मिळायची आणि मी त्यांच्यासारखीच वांगी तोडायचे! मग मी तोडलेली वांगी आम्ही घरी घेऊन यायचो. लगेच सुरेखा मामी त्याचा रस्सा नाहीतर भात करायची.
मी खूप लहान असताना राजामामाकडे गाई होत्या. तो धार काढू लागला की मी तिकडे बघायला जायचे. तेव्हा तो माझ्या तोँडावर दुधाची पिचकारी उडवायचा!
खूप लहान असताना उठल्यावर ताजी दिसली नाही की मला खूप घाबरायला व्हायचं. मग मी धावत मागच्या बागेत जायचे. तिथे ती झाडलोट करत असायची. मला बघितल्यावर, "उठलीस? चहा देऊ?" असं विचारायची. मग चहा, खारी खाऊन तिनी तापवलेल्या पाण्यानी अंघोळ करायचे. ताजीला मुलींना नाहायला घालायला फार आवडायचं. ती आमच्या केसांत तेल घालायची, कानात तेल घालायची आणि मग गरम पाण्यानी खूप छान अंघोळ घालायची. पुढे "मोठ्या" झाल्यावरचे सगळे सोपस्कार तिनी एकटीने पाळले आमच्या बाबतीत. आम्हाला साड्या घेऊन दिल्या, न्हाऊ घातलं, पुरणाचे कडबू केले!
मुडशिंगीतली अजून एक आवडती गोष्ट म्हणजे कासाराकडे जायचं. मामीबरोबर बांगड्या भरायला जायला खूप मजा यायची. कासाराच्या दुकानात बांगड्यांच्या भिंती असायच्या. त्यातल्या हव्या त्या बांगड्या निवडून आम्ही भरून घ्यायचो. मग लाल चुटुक बांगड्या घालून आम्ही दिवेलागणीला घरी यायचो. बांगड्यांचा आवाज व्हावा म्हणून उगीचच हात हलवत रहायचो. सातनंतर मात्र अरूमामाचे सगळे मित्र जमायचे अंगणात. राजकारणावर चर्चा करायचे! कुणी त्यात मामाकडे शेतीविषयक सल्ला मागायला यायचं. पण मुडशिंगीत सात नंतरचा वेळ मला खूप अस्वस्थ करायचा. खेडेगावातल्या संध्याकाळी फार एकाकी असतात. त्या मनापासून आवडायला मनाला थोडं हळू करावं लागतं. रस्त्यावरचा प्रकाश, छोटी छोटी थकलेली घरं, कुणाचातरी पिऊन घरी आलेला दादला, घराघरांतून येणारा भाकरीचा आणि तिखटाच्या फोडणीचा वास, त्यात सातपासूनच मिसळलेला रातकिड्यांचा आवाज. हे सगळं शहरापेक्षा खूप खरं असतं. शहरात संध्याकाळ नेहमी सातच्या मालिकांमध्ये आणि मुबलक विजेच्या दिमाखात झाकोळलेली असायची. त्यामुळे थकलेला दिवस त्याचं जग रात्रीच्या स्वाधीन करून जाताना कुणाला दिसायचाच नाही. ती वेळ फार फार नाजूक असते. कधी कधी माझ्या सहा वर्षाच्या मनातसुद्धा कुठल्यातरी अनामिक भीतीचा सूर खेड्यातली ती संध्याकाळ लावून जायची. त्यामुळे मी सातनंतर ताजीच्या मांडीवर डोकं ठेवून तिला गोष्टी सांगायला लावायचे. पण अशा कित्येक संध्याकाळी गेल्यानंतरही तिन्हीसांजेचे ते काजळ डोळे अजूनही तितकेच भुलवतात!

8 comments:

 1. kiti surekh!
  tujhya sagaLya goshTinmadhye hya goshTi cha soor kahi veGaLach aahe. kasa te sangata yeNar nahi, paN hya goshTi chi complexity aNi depth khup jasta aahe. abhinandan!

  ReplyDelete
 2. बिपीनच म्हणण अगदी खर आहे. गोष्टीचा शेवट हूरहूर लावणा-या कातरवेळेत घेउन जातो.पुरिया धनाश्रीची ऒढ लावणारी आलापी आठ्वू लागते.मस्त जमला आहे तो मूड

  ReplyDelete
 3. @Ustad
  Yeah. I wrote it in the evening and I was kind of feeling eveningish that day. So maybe it rubbed off.
  @Baba
  yeah..I thought of "dayaghana" when I finished writing it. Infact I also listened to it right after. So I guess it is well translated in my writing.
  Thanks for the comments. :)

  ReplyDelete
 4. "माझी भुतं रात्री लहान मुलांसाठी आईस्क्रीम विकायची!"

  lol.

  हे वाक्य वाचून हसून हसून पुरेवाट झाली.

  बाकी पोस्ट नेहमीप्रमाणे खुपच छान !!!

  तु दर वेळी एव्हडी छान, मस्त, भारी, रापचीक लिहितेक कि आता आम्हाला शब्द कमी पडायला लागलेत.

  अनिकेत वैद्य.

  ReplyDelete
 5. कच्चे गहू खायला मला पण आवडायचं . स्पेशली ते शेवयांसाठी आणलेले गहू.. आई साडिच्या पदरावर घेउन ते पदराला चिकटतात की नाही ते बघायची. आणि एकदा गहू पास झाला की मगच तो शेवयांच्या रव्यासाठी दळायला पाठवला जायचा. छे.. उगिच भलतंच काहितरी लिहिणं सुरु केलंय, उगिच कॉमेंटचीच पोस्ट व्हायची नाहितर.. :)
  खुप सुंदर आहे वर्णन तुम्ही लिहिलेलं. अगदी तिथे गेल्यासारखं वाटलं.आणि हो.. पावडर कुंकू हा शब्द आमच्या विदर्भात पण वापरतात बरं कां.. छान लिहिलंय.. :)

  ReplyDelete
 6. फारच सुरेख. पण मुडशिंगीला अगदीच लौकर पोहोचलीस. बाकीच्या रस्त्यातल्या आठवणी रडताहेत ना तुझी आठवण काढत. आता परत येतांना त्यांना भेटत भेटत ये.

  माझ्य़ा उन्हाळ्यच्या सुट्ट्या कोल्हापूर व आंबा (त्या काळात वीजदेखिल नसलेले गाव) या दोन ठिकाणी असत. त्यांची खूप खूप आठवण आली.

  जीवन असेच आठवणीत साठवत रहा व असेच सुरेख लिहित रहा.

  ReplyDelete
 7. @ Aniket
  Thanks. But tu kahi mhanla nahis tari chalel. As long as you enjoy it. :)
  @Mahendra
  Yes! Amchyakade pun shewaya whaychya. Tyacha kharach ek post hoil. Kiti khatatop asaycha!! Thanks for the comment. :)
  @Shrirang
  Ho. Parat yetana tyana pakdun purse madhe ghalun thewte. :) Thanks for all the encouragement. Makes me even more enthusiastic about writing!!
  Cheers!!

  ReplyDelete
 8. Hmm gad mudshingiche trip sahii zalye :) though tuzyaevdha mi kahi kolhapurat rahilo naahiye. mubalk prmanat sandhee uplbdh astaanahi.. now i feel i missed it very badly :( & now can't do much so tryin to njoy thru ur writin.. keep writing :))

  ReplyDelete