Monday, October 19, 2009

चुरमुरे

कोल्हापुरातल्या काही गोष्टी फक्त कोल्हापुरातच बघायला मिळतात. जसं की कोल्हापूरच्या रिक्षा! पुण्यातला रिक्षावाला स्वत:च्या वाहनाकडे अत्यंत अलिप्तपणे बघतो. रिक्षा म्हणजे सकाळी सीटवर (स्वत:च्या पृष्ठभागाला पुरेल एवढं) फडकं मारून बसायचं साधन. मग त्यातून (शक्यतो लोकांना फसवून) जितका पैसा मिळवता येईल तितका मिळवायचा आणि संध्याकाळी तिला खोलीबाहेर ठेवून सरकारमान्य देशीच्या दुकानात जायचं!
कोल्हापुरातले रिक्षावाले सगळे ”देव’-गणावर जन्माला आलेले सत्पुरूष आहेत. बसमधून उतरल्या उतरल्या कोल्हापुरातल्या रिक्षेत चढण्यात जी मजा आहे ती मुंबई, लंडन किंवा अगदी ब्रिसबेनमधल्या टॅक्सीतसुद्धा नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे कोल्हापूरचे रिक्षावाले त्यांच्या वाहनाला त्यांच्या बायकोच्या सुंदर सवतीचा दर्जा देतात. पुण्यातला रिक्षावाला (ज्याला माझ्या आजोबांनी ’भामटा’ ही पदवी बहाल केली आहे), तुम्ही रिक्षेत बसलात की नाही ते सुद्धा न बघता फुर्र्रकन रिक्षा पुढे नेतो. कोल्हापूरचे रिक्षावाले आधी, "या या बसा" म्हणतात. त्यांच्या रिक्षा महालासारख्या सजवलेल्या असतात. सकाळच्या वेळी सुरेश वाडकरची ’ओंकार स्वरूपा’ची कॅसेट लावतात, शेजारीच उदबत्ती लावायची सोय असते. कोल्हापूरचे रिक्षावाले कधीही पुण्यातल्या रिक्षावाल्यांसारखे स्टॅन्डवर रिकाम्या वेळात "संध्यानंद" वाचताना दिसत नाहीत. वेळ मिळेल तेव्हा त्यांची रिक्षा चमकवत असतात. आणि त्यांच्या बोलण्यात विलक्षण आपुलकी असते. पुणेरी रिक्षेवाल्यांसारखे वळण सांगायला उशीर झाला तर लगेच अंगावर खेकसत नाहीत तर, "चालायचंच ताई! पुढून हाय की अजून एक टर्नं!" म्हणतात!

कुणाला वाटेल ही कथा, "बाई माझ्या माहेरचाऽऽऽ वैद्य" च्या चालीवर चालली आहे पण ज्या पुण्यातल्या रिक्षा-पीडित बापुडवाण्या व्यक्तीला याची खात्री करून घ्यायची असेल त्यानी लगेच कोल्हापूरच्या एशियाडमध्ये बसावं!
तशीच अजून एक खास कोल्हापूरची गोष्ट म्हणजे चुरमुरे. यावर काही पुण्यात राहणारे लोक, "शी! त्यात काय एवढं विशेष" असं नाक उडवून म्हणतील लगेच पण ज्यानी कोल्हापुरी चुरमु-यांची नजाकत पाहिलीच नाहीये तो त्याच्या अज्ञानात सुखी राहो! राजारामपुरीतल्या तिस-या की चौथ्या गल्लीच्या कोप-यावर एक चुरमु-याचे दुकान आहे. तिथे इतक्या प्रकारचे आणि इतके खमंग चुरमुरे मिळतात की तिथे गेल्यावर "याचसाठी माझा जन्म झाला असेल" असं म्हणावसं वाटतं. चुरमुरेमामा साधारण सात-आठ प्रकारच्या चुरमु-यांच्या पोत्यांच्या वर्तुळामध्ये बसलेले असायचे. चुरमु-यांशेजारीच खारवलेले आणि झणझणीत तिखट लावलेले दाणे असायचे. त्याबरोबरच वेगवेगळ्या चटक-मटक डाळीसुद्धा असायच्या. मी व अज्जी नेहमी खास चुरमुरे आणायला जायचो. मग परत येताना मी रस्त्यातच पुडा फोडून खायला सुरवात करायचे.
दुपारी कुणीच आमच्या भुकेला दाद देईनासं झालं की मी व स्नेहा चुरमु-यांमध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचो आणि गॅलरीच्या फटींमधून पाय खाली सोडून चुरमुरे खायचो. चुरमु-याचा लाडू आमच्या काही आवडत्या विरंगुळा खाद्यांपैकी होता.
पण या सुंदर चुरमु-यांमुळे किती पदार्थ खुलतात! कोल्हापुरी भडंग या चुरमु-यांमुळेच बहरते. पुण्यातल्या मारवाड्याकडे मिळणा-या प्लॅस्टीकच्या पिशवीतल्या चुरमु-यांची भडंग खाताना नेहमी मला सानेकाकूंनी अचानक गळ्यात मोहनमाळेऐवची घसघशीत कोल्हापुरी साज घातला आहे असं वाटतं. राजाभाऊच्या भेळेचा आत्मा याच चुरमु-यांमध्ये आहे.
कोल्हापूरची भेळही तिथल्या रिक्षावाल्यांसारखीच प्रामाणिक आहे. मामीचा हात भडंग बनवण्यात सरावलेला आहे. ती झोपेतही भडंग बनवू शकेल. तो कार्यक्रम बघायला आम्हाला फार आवडायचं. मोठ्या कढईत आधी तेल तापायचं मग त्यावर चरचरीत लसणीची फोडणी बसायची. आणि त्यात ते खमंग गोजिरवाणे चुरमुरे जायचे. आणि इतक्या घाऊक प्रमाणामध्ये हा प्रकार व्हायचा की दोन मोठाल्या डब्यांमध्ये ती भरली जायची. झाकणाखाली वर्तमानपत्र असायचं त्यामुळे पिठाच्या डब्यांमधून भडंग दुपारी नीट शोधून काढता यायची. मामा बॅंकेतून घरी आला की मोठ्या परातीत भडंग ओतायचा. मग मामी त्याला बारीक कांदा, कोथिंबीर चिरून द्यायची. हे सगळं भडंगेमध्ये घालून त्यावर मामा लिंबू पिळायचा. मग, "हं पोरिन्नो! करा सुरू" म्हणायचा. मामाबरोबर भडंग खायला खूप मजा यायची. परातीतून ताटलीत काढत काढत नंतर आमचे चमचे परातीतच डुबक्या मारू लागायचे. हा सोहळा बघून अज्जीला नेहमी भरून येत असे. मला त्यात एवढं भरून वगैरे येण्यासारखं काय आहे! साधी भडंगच तर खातोय! असं नेहमी वाटायचं. पण तशी भडंग बनवायला मामीचे हात, मामाचा उत्साह, गरम चहाची साथ, उन्हाळी संध्याकाळचा उ:श्वास आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोल्हापुरचे चुरमुरे लागतात हे लक्षात आल्यावर मात्र अज्जीच्या भावना समजतात!!

12 comments:

 1. ek number.........!!
  Rikshawalyan barobarch ajunahi barach kahi ahe Kolhapur baddal.
  pan he hi sahi hota..

  ReplyDelete
 2. हायला, भूक लागली मला...

  ReplyDelete
 3. Mast mi tujha blog yevhadhya ushira ka vachala g??? Aata emane itabare junya post vachate bagh!!!
  Tanvi

  ReplyDelete
 4. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 5. Saee,
  Churmure Kolhapurche ki Sangliche, I think sangaliche :)
  sahi lihilaylas. aatach diwalila ghari jaun aalo, faral tar hotach, shivay bhadang.. ani bhel :) and yes, churmure-dane-shev he combination 24/7 kadhihi chalate, tyacha bhukeshi farsa sambhandh nasato :)

  Sanglikar :),
  Kedar

  ReplyDelete
 6. कसलं ते ! एकदम झकासच की. गॅलरीत पाय सोडून बसण्याचं वर्णन अगदी डोळ्यापुढे उभं राहिलं. मस्त असतो ना तो काळ. हमम मला त्या एकाच वाक्यानं नॉस्टॅल्जिक फील होतंय.

  ReplyDelete
 7. सई आम्ही लहान असताना एक बाबा ’गरम चूरमूरे एssए! अस ऒरडत रस्त्यावरुन जायचा! त्याच्या डोक्यावर एक छान सारवलेल टोपल असाय़च त्यात मस्त चूरमूरे असायचे.तूझ्या या लेखामूळे ती हाक पून्हा कानात घूमू लागली.
  मीना मामीच्या भडंगाची नूसती आठवण जरी झाली तरी तॊंडाला पाणी सुटत!
  एकंदरीत काय,आपल कोल्हापूर लय भारी. कोणी त्याचा नाद नाय करायचा!

  ReplyDelete
 8. कोल्हापूचे चूरमूरे जगप्रसिदध आहेत. आमच्या इथल्या Indian store मध्ये खास export quality चे कोल्हापूरी चुरमूरे मिळ्तात!!! तूझ्या लेखामुळे मलाहि आता चुर्अमूरे आणुन त्याचा भडंग बनवुन खाण्यची प्रबण ईच्छा झाली आहे.
  - गंधाली

  ReplyDelete
 9. आता कधी एकदा कोल्हापुरला जातो असे झाले आहे

  ReplyDelete
 10. ila kp che churmure mi khaalech nahit ki g :((

  kaay upeg mag mi maze baba kolhapurche aahet vagaire sangnyacha? :( jaylaach paayje aata

  ReplyDelete