Tuesday, October 13, 2009

खुळी मायडी

मी पाच वर्षांची असताना पुण्यात हाकामारीची अफवा आली होती. ती म्हणे मुलांना पळवून न्यायची. सगळ्या मुलांनी त्यांच्या घराच्या दारावर फुल्या काढल्या होत्या. त्या फुल्यांना हाकामारी घाबरायची. ती कुठल्यातरी ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजात हाक मारायची, आणि आपण कोण आहे बघायला बाहेर गेलो की पोत्यात घालून पळवून न्यायची. शहाण्या आई-बाबांप्रमाणे माझ्या आई-बाबांनी मला "हाकामारी वगैरे काही नसतं" असं सांगितलं होतं, त्यामुळे मी तशी निश्चिंत होते.
त्याच सुट्टीत कोल्हापूरला गेल्यावर मात्र "खुळी मायडी" हे नाव हाकामारीसारखंच स्नेहा घेऊ लागली. खुळी मायडी अख्ख्या कोल्हापुरात कुठेही असायची. तीसुद्धा लहान मुलांना पकडून त्यांना भीक मागायला लावायची. पण अशा खूप गोष्टी प्रचारात होत्या. तिला म्हणे लहानपणी आई-बाबांनी टाकून दिलं होतं. त्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला व तिला आई-बाबांजवळ राहणा-या मुलांचा खूप मत्सर वाटू लागला. मनाच्या एका कोप-यात ही थाप आहे हे मला माहीत होतं. पण परगावाहून आलेल्या पाहुणीने यजमान मुलांच्या कुठल्याही मताला विरोध करायचा नसतो असा एक अलिखित नियम आहे. मीसुद्धा स्नेहाला पुण्यात जे काही सांगायचे त्यावर ती विश्वास ठेवायची.
मग आमच्या दुपारी 'मायडी दिसली तर काय करायचं' याच्या तयारीत जायच्या. खरं तर मायडी दिसल्यावर क्षणाचाही उशीर न लावता जमेल तितक्या जोरात पळून जाणे हा एकच मार्ग उपयोगी होता. पण का कोण जाणे तो आमचा अगदी शेवटचा मार्ग होता. खिशात तिखटाच्या पुड्या ठेवणे आणि ती जवळ आली की तिच्या डोळ्यात तिखट फेकणे हा आमचा सगळ्यात आवडता मार्ग होता. पण बाहेर जाताना काही केल्या मामी आम्हाला तिखट द्यायची नाही. त्यामुळे मायडीच्या डोळ्यात तिखट फेकायची आमची मनिषा अपूर्ण राहिली.
'घरात चोर आला तर काय करायचं' हा सुद्धा आमचा आवडता खेळ होता. त्यात तर काहीही उपाय होते. चोराला बसा म्हणायचं आणि तो बसायच्या आधी खुर्चीवर तापलेला तवा ठेवायचा. याही खेळात फोडणीच्या डब्यातल्या ब-याच गोष्टींचा वापर होत असे.
स्नेहानी मायडीला पाहिलं होतं. त्यामुळे ती नेहमी तिचं वर्णन करायची. ती म्हणे खूप जाड होती आणि तिला पूर्ण टक्कल होतं. लहान मुली घालतात तसे कपडे ती घालायची आणि तिच्याकडे नेहमी एक पोतडीसारखी पिशवी असायची. यातच ती मुलं लपवायची. मला हीसुद्धा थाप आहे याची पूर्ण खात्री होती. लहान मुलं नेहमी दुस-यावर छाप पडावी म्हणून थापा मारतात. मीसुद्धा अशीच थापाडी होते. त्यामुळे स्नेहाच्या मायडीबद्दलच्या रम्य कथा मी भक्तिभावाने ऐकायचे. रात्री अज्जीच्या कुशीत झोपताना तिला स्नेहा कशी मला घाबरवायचा प्रयत्न करते आहे पण मी कशी शूर आहे याचे दाखले द्यायचे. अज्जी त्यावर, "हूं आता झोप" यापलीकडे काही बोलायची नाही.
मग एक दिवस आम्ही मामाबरोबर पहिल्या गल्लीच्या बागेत भेळ खायला गेलो होतो. भेळ खायच्या आधी नेहमी मामा पाणीपुरीची भवानी देत असे. तर हातात पाण्याची बशी घेऊन रस्त्याकडे बघत आमचा पाणीपुरी कार्यक्रम चालला होता. तेवढ्यात समोरच्या रस्त्यावरची चालणारी माणसं अचानक पांगली. त्यांच्या मध्यभागी फ्रीलचा फ्रॉक घातलेली संपूर्ण टक्कल असलेली, आणि खांद्यावर झोळी अडकवलेली बाई आम्हाला दिसली. सगळ्यांकडे बघून ती हातवारे करून जोरजोरात हसत होती. थोड्यावेळानी गर्दी कमी झाली आणि लोक तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागले. माझी मात्र त्या दिवशी बोबडी वळली होती. त्या रात्री आणि नंतरच्या ब-याच रात्री मला झोपताना नेहमी मायडी आठवायची. आणि जर कोल्हापुरातली मायडी खरी आहे तर पुण्यातली हाकामारी सुद्धा असणार यावर माझा पूर्ण विश्वास बसला. त्यानंतर मीसुद्धा यासारख्या सगळ्या अफवांवर मनापासून विश्वास ठेवू लागले!

6 comments:

  1. मी लहान असताना भुसावळलासुद्धा आली होती बरं का हाकामारी ... आमच्या वर्गातल्या मुली त्यांच्या शेजारच्या गल्लीत हाकामारीने कायकाय केलं ते रोज एकदम तिखटमीठ लावून सांगायच्या :)

    ReplyDelete
  2. बरे झाले तू हा विषय काढलास. ब्रिस्बेनच्या मायडीची आमच्या नीतूला नीट माहिती दे बरं का. मग आम्हाला येथे काळजी नाही !!

    ReplyDelete
  3. :D.. भारीच!! च्यायला आमच्या लहानपणी असं काहीच कसं झालं नाही?? छे!!

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. महान!!! मलाही वेडी मायडी आठवतीये! टाकाळ्याला माया मेडिकलच्या कोपर्‍यावर किंवा खाणीच्या आजुबाजूला अनेकदा दिसायची. तिने माझ्या ताईचा हात धरला होता एकदा!

    btw, तिची आई आणी बहीण ती लहान असताना अचानक गेले तेव्हा तिच्या मनावर परिणाम झाला, असंही मला आठवतंय.

    ReplyDelete
  6. हाहाहा खरंच आहे.

    ह्म्म माझ्याही लहानपणी असं कुणीतरी होत अर्थात तेंव्हा माझा ह्या अफवांवर विश्वास होता.. आणि एमसीटी नंबर असलेली रिक्षा, पोस्टाची लाल रंगाची गाडी ह्या अन् अश्या बर्‍याच अफवा..

    ReplyDelete