Tuesday, June 30, 2009

सिनेमा-सिनेमा


माझ्या आणि स्नेहाच्या स्नेहात सिनेमांचा खूप मोठा वाटा होता. मी चार वर्षाची असताना माधुरी दीक्षित नावाचं दैवत आमच्या आयुष्यात आलं. मग सुट्टीनंतरचे दहा महिने आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे आमचा सिनेमा व्यासंग वाढवत असू. त्यातही माधुरी आम्हाला खूप आवडायची. तिचे नाच बारकाईने पाहून तसेच्या तसे करायचा आम्ही प्रयत्न करायचो. मला पुण्यात तितके सिनेमे बघायला मिळायचे नाहीत. कारण माझा आठवडा नाचाचे क्लास, गाण्याचा क्लास, अभ्यास आणि बाबाबरोबर पेशवे बागेत जाणे यात संपून जायचा. पण स्नेहा मात्र चित्रहार, छायागीत वगैरे मधून तिचं शिक्षण चालू ठेवायची. 
सुट्टीला जायच्या आधी मी बघितलेल्या सिनेमांची यादी डोक्यात करून ठेवायचे. भेटल्या भेटल्या आधी माझी बॅग उघडली जायची. मग मी काय काय कपडे नेले आहेत व त्यातले कुठले कुठले "अदला-बदलीत" ठेवायचे याचे महत्वाचे निर्णय आम्ही आधी घ्यायचो. मग स्नेहा पण मला तिनी घेतलेले नवीन कपडे दाखवायची. मी तिचे कपडे घालावेत असं तिला फार वाटत असे. बाहेर जाताना नेहमी आधी तिचे कपडे दाखवायची. मग मी सुद्धा लाडोबासारखी काय हवं ते छान घालायचे. स्नेहाकडे नेहमी "साजन" ड्रेस, "राम-लखन" ड्रेस वगैरे बॉलिवूड प्रेरित कपडे असायचे. माझी आई मी सात आठ वर्षाची होईतो माझे सगळे कपडे शिवायची. तिच्याकडे असली फिल्मी मागणी केली की तिचा पारा चढायचा. म्हणून स्नेहाचे फिल्मी कपडे मला फार आवडायचे. मग ड्रेस घातला की त्याला मॅचिंग रीबीन, बांगड्या, टिकली सगळं स्नेहाकडे असायचं! 
त्यानंतर मात्र मला अगदी न आवडणारा प्रकार सुरू व्हायचा. सिनेमाची स्टोरी! मला सिनेमे बघायला आवडायचं पण सिनेमा पाहून आल्यावर त्याची गोष्ट कुणाला सांगायला मला अज्जीबात आवडायचे नाही. पण स्नेहाचा हा आवडता छंद होता. कधी कधी तिनी न पाहिलेला सिनेमा मी पाहिला असेल तरी मी ते तिच्यापासून लपवून ठेवायचे. तसंच मला न पाहिलेल्या सिनेमाची गोष्ट ऐकायलाही आवडत नाही. पण हे सगळं स्नेहाला जाम आवडायचं. खूप दिवसांनी भेटल्यावर करायच्या पहिल्या काही कामांमध्ये तिला मला तिनी पाहिलेल्या सिनेमांच्या स्टोर्‍या सांगायला आवडायचे. 
तिची तीन तासाच्या सिनेमाची स्टोरी सहा तास चालायची. आधी सिनेमा पहायचं कसं ठरलं यापासून सुरूवात व्हायची.
"अगं सयडे तुला माहितच आहे की पप्पांची सगळी कामं कशी असतात! तिकिटच घेऊन आले! मग मी आणि आई अक्षरश: दहा मिनिटात तयार झालो. वाटेत किल्लेदार काकी भेटल्या. त्यांच्याशी बोलत बसले गं पप्पा त्यामुळं जाहिराती चुकल्या."
मग प्रत्येक शॉट, त्यात हिरॉईनचे कपडे,केशभूषा, दागिने सगळ्यासकट तिची स्टोरी असायची. त्यातही काही खास नवीन अदा वगैरे असल्या तर ती स्वत: करून दाखवायची. एखादं गाणं खूप प्रसिद्ध झालं असेल तर सिनेमाच्या ज्या भागात ते आहे तिथे त्याचा नाच पण करून दाखवायची कॅसेट लावून. त्यामुळे मला सिनेमापेक्षा जास्त करमणूक फुकटात मिळायची. 
मी काही पूर्ण पाच सहा तास तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नाही. तिचा खूप महत्वाचा सीन चालू असताना नेहमी माझ्या डोक्यात, "अज्जीने बेसनाचे लाडू कुठल्या डब्यात ठेवले असतील?" वगैरे प्रश्न यायचे. तिला जरा जरी कुणकूण लागली की माझं लक्ष उडालंय तर ती लगेच "अत्ता मी काय सांगितलं सांग पाहू" असं खडसावायची. मग मी सफाईदारपणे आधीच्या तीस सेकंदांतल्या सगळ्या ओळी म्हणून दाखवायचे. मला स्नेहामुळे कानानी ऐकणे व डोक्यानी वेगळाच विचार करणे ही अतिशय उपयोगी सवय लागली. अजूनही माझ्या "भवितव्याबद्दलच्या" माझ्या गाईडच्या कल्पना ऐकताना मी सोयिस्करपणे वेगळा विचार करते. :)
दुसरा आवडता फिल्मी विरंगुळा म्हणजे माधुरीच्या गाण्यावर नाच बसवणे. मला सिनेमातला नाच तसाच्या तसा करायला आवडायचे नाही. कारण मग मधे मधे जेव्हा हीरो हिरॉईन हिमालयात वगैरे नाच न करता जातात तेव्हा आमच्याकडे करायला काहीच नसायचं. आणि त्यात आमच्या डोक्यानी काही बसवलं की ते खूप विनोदी दिसायचं. त्यामुळे मी सगळा नाच स्वत:च बसवायचे. यावरून बरेचदा माझं आणि स्नेहाचं भांडण व्हायचं. पण वाटाघाटीतून काहीतरी तोडगा निघायचा. कधी कधी आम्ही दिवसभर नाच बसवायचो. मग शनिवारी नरूमामा लवकर आला की अज्जी,मीना मामी, मामा सगळ्यांना नाच करून दाखवायचो. 
मधेच कधीतरी स्नेहाला "आपल्याला सईसारखं भरतनाट्यम् येत नाही" याची अचानक जाणीव व्हायची. मग मी तिला शिकवायचे. पण नाच करण्यापेक्षा दंगाच जास्त व्हायचा. सुट्टीला जाताना आई नेहमी माझ्याबरोबर भरतनाट्यमचा सराव करायची वही वगैरे पाठवायची. पण ते दोन महिने मी कुठलेही नियम न पाळता नाचायचे. तो नाच मला सगळ्यात जास्त आनंद देऊन गेला. :)
सुट्टी संपताना आम्हाला दोघींनाही वाईट वाटत असे. आता परत शाळा या विचारानी तर वाईट वाटायचंच पण रोज नाच बसवायला मिळणार नाही याचंही दु:ख होत असे. मला शाळा कधीच मनापासून आवडली नाही. शाळेतल्या माझ्या (दंगेखोर) मैत्रिणी नेहमी मला,"शाळा कशी काय आवडू शकत नाही तुला?" असा टोमणावजा प्रश्न विचारायच्या. पण शाळेतले ते "गट", सगळ्यात हुषार कोण, सगळ्यात प्रसिद्ध कोण आणि थोडं मोठं झाल्यावर सगळ्यात सुंदर कोण याचे निकष मला अजिबात पटायचे नाहीत.आणि का कोण जाणे शाळेत खूप मैत्रिणी असूनही मला शाळा भूमितीच्या पुस्तकासारखीच निरस वाटायची.  आणि मग मार्च महिन्याअखेरी कुठल्यातरी मराठी कवितेची शेवटची उजळणी करताना माझे कान कविता ऐकायचे आणि मन मात्र वर्गाच्या खिडकीतून अडीचशे किलोमीटर ओलांडून कोल्हापूरला जायचं. जिथे माझी सर्वात सुंदर जिवाची सखी  तिच्या शाळेच्या बाकावर मला सांगायच्या सिनेमा स्टोर्‍यांची यादी बनवत बसलेली असे!

Saturday, June 27, 2009

नरू मामा

माझ्या इतर दोन मामांच्या भाषेत नरूमामा "माझा लाडका" मामा आहे. लहानपणापासून हा समज मला दूर करायची इच्छा होती पण ती अजूनही पूर्ण झालेली नाही. नरूमामा तीन भावांत मधला. के.डी.सी.सी बॅंकेत तो नक्की कुठल्या हुद्द्यावर आहे हे मला आजपर्यंत कळले नाही पण दिसायला मात्र तो "मॅनेजर" आहे. पु.ल नाथा कामतला जसं "अल्लाघरचा मोर" म्हणतात तसा नरूमामा "अल्लाघरचा मॅनेजर" आहे. ताजीचा नीटनेटकेपणाचा गुण जर कुणी शंभर टक्के घेतला असेल तर तो नरूमामानी. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे, स्वच्छ, सुबकरित्या मांडलेल्या असतात. घराची साफ-सफाई, झाडलोट, रंगरंगोटी अगदी प्रेमानी करणारा गृहस्थ म्हणजे नरूमामा. 
नरूमामा आणि माझा बाबा एकमेकांना "पावणं" या नावानी हाक मारतात. दोघे "गुणांमध्ये" अगदी विरूद्ध. त्यामुळे नरूमामा नेहमी माझ्या बाबाला "कसला कारभार पावणं तुमचा" म्हणून चिडवत असे. बाबाला एकही गोष्ट वेळेवर सापडत नाही. त्यात बर्‍याच वेळेस बाबाच्या वस्तू मोडायच्या. आणि या ना त्या कारणाने त्या दुरुस्त होत नसत. मग नरूमामानी त्याला "मोडका बाजार" असं नाव पाडलं. दर वेळी या नावाचा उल्लेख झाला की बाबा संतापाचा गोळीबार सुरू करत असे. मग नरूमामा माझ्याकडे बघून डोऴे मारत "चुकलं पावणं! परत नाही म्हणणार तुमच्या वस्तूंना मोडका बाजार!" अशी मिस्किल माफी मागायचा. 
नरूमामाचा आवडता पोषाख म्हणजे सफारी! कधी कधी तो त्याच्या साहेबाचा साहेब वाटायचा. परत केस फिक्क पांढरे त्यामुळे मी दहा वर्षाची असतानाच त्याला "नात काय तुमची?" असे प्रश्न विचारण्यात यायचे. त्यावरही तो बिचारा "तरी बरं अजून मीना मुलगी का म्हणून विचारत नाहीत" अशी समजूत घालून घ्यायचा. पण सकाळी दूध आणायला जाताना तो लुंगीवर सफारी शर्ट घालून जायचा. तेव्हा मात्र माझा बाबा त्याला " काय पावणं कसला अवतार तुमचा" म्हणून चिडवायचा. 
त्याला मार्केटिंग करायची खूप हौस आहे. आईने तिच्या "उमेदीच्या" काळात नरूमामाला साखर कारखान्यांत मार्केटिंगची जबाबदारी दिली होती. तेव्हा तो आई पोहोचायच्या आधी तिथे जाऊन आईचे "वलय" तयार करायचा. त्यात तो अज्जीच्या कौतुक वर्षावाला सुद्धा शह द्यायचा. पट्टीच्या गायकाचा सूर लागावा तसा त्याचा लागायचा आणि मग मशीन खपवायला तो आईला हिमालयाच्या उंचीवर नेऊन ठेवायचा. त्यानी प्रस्थापित केलेली "जागतिक पातळी" गाठायला आईला पुढे दहा वर्ष लागली. तो जाऊन आलेल्या ठिकाणी जाताना आईला परीक्षेला गेल्यासारखे वाटायचे. माझ्याही बाबतीत काहीही "खपवायचे" नसतानासुद्धा तो असाच सुटतो. मग बाहेर आल्यावर "काय हे नरूमामा! आसं नाहीये, तसं आहे" असं सांगायचा प्रयत्न केला की "काय कळतंय त्यांना! आपण दाबून सांगायचं!" असं उत्तर मिळायचं. 
नरूमामाबरोबर बाहेर जायचं म्हणजे दर दहा फुटांवर त्याला "मित्र" भेटणार. मग "काय म्हंतायसा नरूभाऊ" म्हणून प्रत्येक ठिकाणी चर्चा होणार! सगळ्यांची कामं करून देण्यात नरूमामा पुढे. अगदी स्वत: केलं नाही तरी त्यांना योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम तरी नरू मामा नक्कीच करत असे. 

त्याचा अजून एक अतिशय निरागस गुण म्हणजे देवाची पूजा करणे. मूर्तिपूजा व्यर्थ आहे असं म्हणणार्‍यांनी नरूमामाचा देव्हारा बघावा. रोज सकाळी लवकर उठून स्वत:च्या बागेतली फुलं काढून नरूमामा पूजा करतो. टपोरी जास्वंदी, तजेलदार मोगरा, सुगंधी गुलाब, रसरशीत झेंडू असली सगळी फुलं नरूमामाचे देव उपभोगतात. त्याची गावातली काही खास आवडीची दुकानं आहेत जिथून तो तर्‍हेतर्‍हेच्या उदबत्त्या आणतो. त्यातही त्याची अदलाबदल चालू असते. आजकालच्या जगात देवासमोर लावायच्या उदबत्तीबद्दल कोण इतका विचार करतो? पण नरूमामाची भक्ती सुद्धा रसिक आहे. दर गुरुवारी नरूमामा उपास करतो (एकवेळ जेवून) आणि रात्री मामी मोठ्या प्रमाणावर साबुदाण्याची खिचडी करते. त्यामुळे सगळ्या घराचाच गुरुवार असतो! लहान असताना मामा मला व स्नेहाला स्कूटरवर बसवून साईबाबाच्या देवळात न्यायचा दर गुरूवारी. मग पुजार्‍यांना "ही माझी भाची बरका! पुण्याची! खूप हुषार आहे" शी ओळख करून द्यायचा. मग नारळ-पेढे पुजारी माझ्या हातात द्यायचे! फार आनंद व्हायचा मला तेव्हा!
कुठल्याही कामाचा ताबा घ्यायला नरूमामाला फार आवडते. त्यामुळे कधीकधी स्वयंपाकघरातसुद्धा त्याची हुकुमशाही सुरू होते. हा गुण (?) मात्र अजोबांचा आहे. मी पुण्याला परत येताना नरूमामा नेहमी आईसाठी तिखट भडंग पाठवत असे. तेव्हा मीनामामीला "मदत" करण्याच्या निमित्ताने तो स्वयंपाकघरात यायचा आणि अंती तिला मदतनीस करून टाकायचा. ती बिचारी काही सूचना द्यायला गेली की तिला स्वयंपाकातला काहीच अनुभव नसल्यासारखी वागणूक मिळायची. 
कधी कधी मोदक करायलाही तो पुढे यायचा आणि मामीला "तुला काय कळतंय त्यातलं?" असा सवाल करायचा. 
घरात गणेशोत्सव साजरा करण्यात नरूमामा पुढे असायचा. कुंभार गल्लीतून आम्ही नरूमामानी "खास" पसंत केलेली मूर्ती आणायचो. आदल्या रात्री सगळे मिळून मखर, पताका, दिवे अशी सजावट करायचो. मग गणपती आले की सगळे भाडेकरू आधी आमच्या आरतीला यायचे. गल्लीत कुणाचाच गणपती आमच्यासारखा नसायचा. त्यात कुणाचं पिल्लू असेल आरतीला तर त्याला आरती धरायचा मान मिळायचा. 
नरूमामाला लहान मुलांशी दोस्ती करायची फार आवड. सगळ्या भाडेकरूंच्या मुलांना स्कूटरवरून चक्कर मारायला न्यायचा. त्यांची कौतुकं करायचा. त्यामुळे आपापली घरं केल्यानंतरही सगळेजण त्याला भेटायला यायचे. त्याची कामं करून द्यायचे. 
घरात मात्र अजोबांशी त्याचं कधीच नीट जमलं नाही. तसं अजोबांशी कुणाचंच नीट जमत नाही. त्यामुळे त्याचा घरातला चेहरा आणि अकराव्या गल्लीच्या कोपर्‍यावरचा चेहरा यात खूप फरक असायचा. गल्लीच्या कोपर्‍यावर गेला की नरूमामाचं स्वत: बनवलेलं, मित्रमंडळींचं जग सुरू व्हायचं. त्यामुळे त्याच्या चेहर्‍यावर नेहमी हास्य असे. घरातही स्वत:च्या खोलीत त्याला रफीची गाणी ऐकायला फार आवडायचे. कधी कधी रंगात आला की स्वत: सुद्धा गात असे! 
तो नेहमी खोलीत अंघोळीनंतर गात गात यायचा. त्याचे त्यावेळी कुठेही लक्ष नसायचे. त्यामुळे एकदा चुकून त्याचा पाय एका माऊवर पडला होता. त्या माऊला (अर्थातच) स्वर्गवास झाला. त्याचे प्रायश्चित्तसुद्धा त्याने काशीला जाऊन केले!!
असा सरळ, रसिक, धार्मिक, प्रेमळ आणि कुशल मामा कुणाचा लाडका होणार नाही? त्यातही माझं स्वत:चं असं काही म्हणणं नाही! पण नरूमामाकडे बघून जाणवतं की रोजचं आयुष्य समाधानाने आणि रसिकतेने जगता येणे हे जगापुढे "यशस्वी" होण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे!

ले.त.गा.आ

Saturday, June 20, 2009

कविता आणि लावणी

अज्जीनी मला खूप कविता शिकवल्या. पण तिची कविता शिकवायची नजाकत काही वेगळीच होती. एखादी खूप अस्वस्थ करणारी कविता शिकवली की लगेच तिचं अत्र्यांनी केलेलं विडंबन वाचून दाखवायची. त्यामुळे "महान काव्याची" मस्करी करू नये असा संदेश मला बिलकुल मिळाला नाही. उलट काहीही नवीन कानावर पडलं की त्याचं मूळ कवितेपेक्षा छान विडंबन कसं करावं याच्या मागे मी लगेच लागायचे. 
"हे कोण बोलिले बोला
राजहंस माझा निजला" 
याचं अत्रेंनी केलेलं
"हे कोण बोलिले बोला
चिंचेवर चंदू चढला"
हे विडंबन ऐकून त्यांचा खूप राग आला होता मला. आणि ते इतकं लीलया वाचून दाखवल्याबद्दल अज्जीचाही. पण कुसुम आणि ताई अज्जी दोघींकडे अप्रतीम विनोद बुद्धी होती. ताई अज्जी सुद्धा "मयतीचे" खास विनोद करायची. अगदी स्वत:च्या सुद्धा. 
तर अशा अनेक कविता मोडून मी कविता करायला शिकले. 
कुसुम अज्जीच्या माहेरी अनेक "कोटीभास्कर" होते. आईचे सगळे मामा विविध कोट्या करायचे. त्यामुळे त्यांच्या सहवासात नांदण्यासाठी मलासुद्धा ही कला शिकावी लागली. 
आज्जीच्या मोठ्या भावाने स्वत:च्या धाकट्या मुलाचं नाव "अलंकार" ठेवलं. याचा दुसरा अर्थ संस्कृतमध्ये "अलम्" म्हणजे "पुरे" असा होतो. तिच्या माहेरी नणंदा-भावजयांची शीतयुद्धं सुद्धा संस्कृतमध्ये होत असत. 
अज्जीला शब्दांचे वेड होते. सुंदर शब्द माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तिने सगळे मार्ग खुले ठेवले होते. अगदी लावणीचे सुद्धा. दहा-बारा वर्षांची असताना "तुला कुठली गाणी आवडतात?" या प्रश्नाला मी निरागसपणे "लावणी" असं उत्तर द्यायचे. त्यावेळी मी ऐकलेल्या आणि पाठ केलेल्या लावण्या म्हणजे होनाजी बाळा, अमर भूपाळी, रामशास्त्री असल्या खूप जुन्या चित्रपटांतल्या असत. अज्जीने व आई-बाबाने मला खास त्याच्या कॅसेट्स दिल्या होत्या. त्यामुळे पुण्यातली काही मंडळी चकित होत असत. त्यांच्या चेह-यावर "काय मुलगी आहे! म्हाता-या आजीसमोर सरळ लावणी म्हणायला तयार!" असे असायचे. 
पण "सुंदरा मनामधे भरली" न अडखळता, एका दमात, सुरात, तालात आणि स्पष्ट उच्चारासहित म्हणणे हे चर्पटपंचरी म्हणण्यापेक्षाही जास्त अवघड आहे. थोडी मोठी झाल्यावर मी लोकांना याचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवायचे. कारण मला एकेकाळी चर्पटपंजरी सुद्धा पाठ होती! 
झोपाळ्यामागे एक दगडी कट्टा आहे. कोल्हापुरातल्या खूप संध्याकाळी टी.व्ही न बघता ताजी, कुसुम अज्जी,मीना मामी आणि सगळ्या शेजारणी माझ्या लावण्या ऐकायला यायच्या. मग त्या कट्ट्यावर चढून मी सगळ्या जुन्या लावण्या म्हणून दाखवायचे. अगदी अजागळ हावभावासकट! मग लटपट लटपट अगदी "लटपटून" करून दाखवल्याबद्दल मला सगळ्या बायका मिठ्या मारायच्या! तसं दुस-यांना लावणी ऐकायची आहे म्हणून करून दाखवणे मला अजिबात आवडत नसे. पण मी लावणी करत असताना कुणी बघायला आलं की माझा उत्साह वाढत असे. 
होनाजी बाळातली एक लावणी मला फार आवडायची. तिचे शब्द अगदी शेला विणल्यासारखे गुंफले होते.
त्यात "नारी तुझी गजाची गं चाल" असं एक वाक्य होतं. तेव्हा मी हसून "म्हणजे कवी तिला हत्ती म्हणतोय?" असं विचारलं होतं. मग पुढल्यावेळी भवानी मंडपात हत्ती बघितल्यावर लक्षात आलं की "गजाची चाल" किती सुंदर असते! 
लहानपणीची काही वर्ष मी आगाऊ म्हणून प्रसिद्ध असणार.  कारण एवढसं, नकटं, शेमडं नाक उडवून जर कुणी 
"अरे जशी मनमथरती धाकटी
सिंहसम कटी उभी एकटी
गळ्यामधी हार..
कोण सरदार हिचा भर्तार" असं वयाला न झेपणारं गाणं म्हणू लागली तर जरा विनोदीच वाटेल.
पण थोड्याच दिवसांत माझे पाय करकरणा-या कोल्हापुरी जोड्यांमध्ये बसू लागले. तसं त्या सुंदर शब्दांचा अर्थसुद्धा कळू लागला. अजूनही कळतोय. 
पण शब्द सुंदर असतात हे मला शिकवण्यात अज्जीचा खूप मोठा हात आहे.
कुसुम अज्जीचं "सासरचं" नाव "अनुराधा" आहे. या नावाने तिला कुणीही बोलवत नाही. पण घराच्या पाटीवर मात्र ते नाव छान झळकतं. खूप सुंदर नाव  आहे. पण कधी कधी वाटतं, अजोबांनी राधे ला "अनु" लावून या सगळ्या मायाजाळाला एक गोंडस रूप द्यायचा प्रयत्न केला असावा. पण ताजी आणि अज्जी मध्ये नशीब सोडता कुठेच "अनु" लावता येणार नाही. 
आमच्या कोल्हापूरचा "वसंत" "कुसुम" आणि "मालती" मुळेच पूर्ण झाला. कोण आधी आणि कोण नंतर हे माझ्यासारख्या सख्ख्या-सावत्र नातीसाठी महत्वाचे नाही! कारण रोज एकदा तरी मला दोघींचीही आठवण येते!

ले.त.गा.आ =)

Friday, June 12, 2009

बाबाची गोष्ट

लहानपणी जेवताना गोष्टी ऐकायची फार आवड होती मला. पण प्रत्येकाच्या गोष्टीत वेगळी कला असायची. गोष्टी सांगण्यात पहिला नंबर बाबाचा असायचा. त्यानंतर दहा जागा मोकळ्या आणि अकराव्या नंबरावर अज्जी! बाबा समोरच्याला काय हवे आहे याचा फार बारीक विचार करायचा. त्यामुळे जेवायच्या आधी तो सरळपणाने "पिल्लू आज कुठली गोष्ट सांगायची?" असं विचारायचा. मग काहीही सांगितलं तरी कुठलीही "बापगिरी" न करता छान सुरुवात करायचा. कधी कधी तो सुट्टीत सुट्टी घेऊन खास मला भेटायला कोल्हापूरला यायचा. मग मी सगळ्यांना "बघा माझे बाबा कसे गोष्ट सांगतात" या निमित्ताने गोळा करायचे.
कधी कधी बाबाला मी यादी पण द्यायचे. आजच्या गोष्टीत एक चेटकीण, एक घुबड, एक शूर मुलगी, खोलीभरून साप आणि बोलणारे बेडूक हवे. त्यातही जर अगदीच नावडती भाजी असेल तर मग, साप चेटकिणीच्या गटात आणि बोलणारे बेडूक मुलीला मदत करणार वगैरे अटी घालायचे. बाबा आनंदाने सगळ्या अटी मान्य करून लगेच गोष्ट तयार करायचा! मग मध्येच बेडकाचा आवाज पण काढायचा. हे सगळं ऐकून बच्चे कंपनी जाम खूष व्हायची.
झुरळ ही कीटक जमात माझ्या कुंडलीतील राहू असावी आणि नाकतोडा केतू! या दोन किड्यांना मी आजही खूप घाबरते.
ब-याचदा रात्री पाणी प्यायला जाताना सुद्धा मी अज्जीला उठवायचे. पुण्यात बाबा माझे सगळ्या प्रकारच्या कीटकांपासून रक्षण करीत असे. कोल्हापुरात मात्र त्याची ही जबाबदारी म्हातारी अज्जी पार पाडायची. अजूनही काम जास्त असेल तर तणावामुळे मला माझ्या खोलीत शेकडो उडणारी झुरळं आली आहेत व दार उघडत नाहीये अशी स्वप्न पडतात!
मग कधी कधी बाबा आणि मी झुरळ-बेगॉन असे खोली नाट्य पण करायचो. त्यात बाबा झुरळ व्हायचा व मी बेगॉनचा स्प्रे!
मग मी माझा काल्पनिक झुरळ-वध साजरा करायचे. ब-याच वेळेस या उत्साहात बाबा मला भरवायला विसरून जायचा!
बाबा तासंतास त्याच्या मित्राशी (विजू काकाशी) जगातल्या राजकारणावर वाद घालत बसायचा. मी इकडे तिकडे खेळत असताना माझ्या कानावर मिखाईल गार्बोचाव, जॉर्ज बुश, सद्दाम हुसैन वगैरे नावं पडायची. मग काही काही गोष्टींमध्ये चेटकीण आणि बुश पण एकत्र येण्याची फरमाइश व्हायची. तसल्या मागण्या आठवल्या की बाबाची मनापासून दया येते. मी जर माझा बाबा असते तर मी दमून गेले असते. कोल्हापूरला बाबा आला की सग्गळी कार्टी झोपाळ्यावर जमायची. मग एखादी भुताची गोष्ट रंगात आली की हळू हळू पोरं घाबरून आपापल्या घरी पळायची. पण मला भुताच्या गोष्टी फार आवडायच्या. त्यात बाबाची भुतं पण मस्त असायची. कुणाला एकच डोळा, एखादं लठ्ठ भूत, एखादं रडकं भूत (नेहमी या भुताशी माझं वागणं मिळतं जुळतं असायचं). त्यामुळे बाबाच्या गोष्टी कधीच संपल्या नाहीत. आम्हीच उगीच मोठ्या झालो.
बाबाच्या गोष्टीत कधीही "गोष्टीचे तात्पर्य" वगैरे गैरसोय नसायची. कधीही शिकवण वगैरेची भानगड नसायची. त्याची गोष्ट म्हणजे सगळ्यांना हवा तसा मिळून केलेला गोपाळकाला. लहान मुलांमध्ये लठ्ठ फ्रेमवाला चष्मा लावून बसणारा खाष्ट बाबा तो कधीच नव्हता. त्यामुळे आमच्यातलाच पण मिशीवाला मित्र मिळाल्याचे समाधान मिळायचे. नरू मामा बाबाची खूप मस्करी करायचा. बाबाचा विसराळूपणा, त्याचे 'पसारे' वगैरेची मामा खूप फिरकी घ्यायचा.पण मुलांना कसं खूष ठेवायचं या विषयांत मामा सुद्धा बाबाला गुरू मानायचा!
पण बाबाची कल्पनाशक्ती तो कधी कधी स्वत:ची करमणूक करायला सुद्धा वापरायचा. तेव्हा मला त्याचा सात्विक संताप यायचा. त्याची आवडती गोष्ट म्हणजे "गुलाबराव दिडमिशे". हे नाव माझ्या अजूनही छान लक्षात आहे. बाबा मला चिडवताना म्हणायचा, "तू आमची मुलगी नाहीसच! तुला शहराची हवा लागावी म्हणून गावाकडून आणलंय".
या गोष्टीत मी गुलाबराव दिडमिशे नावाच्या रग्गड श्रीमंत पण खेड्यात राहण्या-या पाटलाची मुलगी असायचे. माझी आई म्हणजे सत्यभामाबाई. आमची खूप शेती वगैरे पण मुलीला शहरात वाढवायची हौस असल्याने त्यांनी मला असे शहरी आई-बाप विकत घेऊन दिले! मी मोठी (?) झाले की बाबा मला परत पाठवणार होता. त्यात गुलाबरावांनी माझं लग्न पण ठरवलं होतं त्यांच्याच गावातल्या शिवाजीशी! म्हणून माझं नाव सई ठेवायचा खटाटोप! त्यात शिवाजी माझ्यापेक्षा दहा एक वर्षाने मोठा!
ही गोष्ट तो इतकी रंगवून सांगायचा की थोड्यावेळाने मला खरी वाटू लागे. मग मी जोरदार भोंगा पसरायचे. आई बिचारी खूप वेळा, "नको रे चिडवूस तिला" असं काकुळतीला येऊन म्हणायची.
तशीच एक अत्यंत बोचरी व्यक्तिरेखा म्हणजे "सुगंधा". ही सत्वगुणांचा अर्क मुलगी सुद्धा काल्पनिक होती. यात मात्र बाबाला विजू काकानी खूप मदत केली होती. मी जे काही करायचा कंटाळा करायचे ते सग्गळं सुगंधा आनंदाने करायची. आईला मदत करणे, गणितं सोडवणे, पाहुण्यांना नाच करून दाखवणे, हट्ट न करणे अशा अनेक गोष्टी ती करायची. त्यामुळे मी कधी नाठाळपणा करू लागले की लगेच सुगंधाशी तुलना व्हायची. ही सुगंधा म्हणे विजूकाकाच्या चाळीतच कुठेतरी रहायची. खूप दिवस सुगंधा भेटली की तिला कसं ढकलायचं, कुठे बोचकारायचं वगैरे बेत मी केले होते.
कधी कधी मात्र बाबा मला चांदोबा वाचून दाखवत असताना मी झोपून जायचे. मग बाबा एकटाच ती गोष्ट वाचत बसायचा. मला वाचून दाखवायच्या निमित्ताने बाबानी खूप पुस्तकं स्वत: वाचून काढली. माझ्या मते किपलिंगचं जंगल बुक त्याचं सगळ्यात आवडतं पुस्तक! हल्ली मात्र मी बाबाला काय वाच काय नको हे सल्ले देते. बाबाला गोष्ट नाही जरी सांगितली तरी पुस्तकांकडे नेण्याचं काम मी नेहमी करते. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करायला पण मला खूप आवडतं. आणि माझ्या या गोष्टींबद्दलच्या गोष्टी वाचून आई-बाबा खूप खूष होतात!
कुणीसं म्हटलंय "घेता घेता एक दिवस, देण-याचे हात घ्यावे!".. :)

Monday, June 8, 2009

कौतुक

माझ्या सुट्टीला लागणारं एकमेव ग्रहण म्हणजे पाहुणे आणि त्यांच्यासमोर अज्जीने केलेले माझे कौतुक. कुसुम अज्जीला माझं खूप म्हणजे खूप कौतुक! त्यामुळे पाहुणे आले की त्यांच्यासमोर,

"अहो! इतकी हुषार आहे काही विचारू नका. नाच, गाणं, अभ्यास, वाचन सगळ्यात हुषार हो! काही येत नाही असं नाही!"
सुरुवातीला मला छान वाटायचं. पण मग असं एकटीचं कौतुक झालं की स्नेहाला फार वाईट वाटायचं. तसं अज्जीला सगळ्यांचंच कौतुक होतं पण त्यातल्या त्यात मुलीच्या मुलीचं जरा जास्त. त्यामुळे स्नेहा नंतर कधी कधी गाल फुगवून बसायची. ती नाही तर मीना मामी तरी! आणि मी काही तितकी हुषार वगैरे नव्हते. पुण्यात माझ्याच वर्गात माझ्यापेक्षा कितीतरी मुलं हुषार होती!
मग या ग्रहणापासून दूर होण्यासाठी मी व स्नेहा पाहुणे आले की टाकीवर चढून बसायचो!
तसं पाहुण्यांसमोर "गाऊन दाखव" असा हुकुम अगदीच नको असायचा. मला व पाहुण्यांनाही!
लहानपणी माझ्यावर गाणं शिकायची वेळ आली होती! मी बोलायला लागताच माझ्या स्वरयंत्रात बिघाड आहे हे आई-बाबांना लक्षात आलं. माझा आवाज घोगरा होता. म्हणजे देवानी माझ्या स्वरयंत्राचे स्क्रू आवळले नसतील बहुधा. त्यामुळे बस सिग्नलवर थांबूनही जसा आवाज करते तसा आवाज माझ्या प्रत्येक शब्दातून यायचा. आईच्या भाषेत माझा आवाज "फुटक्या ड्रम" सारखा होता!
मी चार-पाच वर्षाची होताच,"असल्या आवाजामुळे हिचं लग्न होणार नाही", वगैरे चिंता तिला भेडसावू लागल्या. मग कुणी
"मध द्या रात्री झोपताना"
"घशात गोट्या घालून गीता म्हणायला लावा"
वगैरे सल्ल्यात गाणं शिकवणे हा एक सल्ला आला!
झालं! शाळेतल्याच मराठे बाईंकडे माझं संगीत शिक्षण सुरू झालं आणि अज्जीला शास्त्रीय संगीत हा एक कौतुकाचा विषय मिळाला!! लगेच स्नेहाला पण संगीत विद्यालयात दाखल करण्यात आले.
मग, दोघी गाणं शिकतात, या वाक्याने पाहुण्यांचा छळ द्विगुणित झाला.


पाहुण्यांसमोर "राग भूप" असं वहीत लिहिलेलं वाचून सुरुवात व्हायची.
मग सा-रे-ग-प-ध-सा (वरच्या सा वर माझा आवाज नेमका फुटायचा) असा आरोह-अवरोह म्हणून दाखवायचो.
मग पाहुण्यांच्या कांदे-पोहे, बेसनचे लाडू फराळात आमचं, "फुलला ऋतू रा ss जा, बहरला!" सुरू व्हायचं.
तान आली की आम्ही स्वरांशी झटापट करायचो! पाहुण्यांचे व आमचे चेहरे एकसारखे निराकार! फक्त हे जे काही चालले आहे ते पुढील पाच मिनिटांत संपणार आहे या भरवशावर दोन्ही पक्ष शांत असायचे!
तरी अज्जीच्या माहेरच्या लोकांना निदान भूप वगैरे माहित तरी होतं! ताजीच्या माहेरच्यांचा अगदीच फुकट बळी जात असे. त्यांना माझं गाण्याशिवायही खूप कौतुक होतं. नुसती त्यांच्या चुलीवरची भाकरी भरल्या वांग्याबरोबर मिटक्या मारत खाल्ली तरी त्यांना फार आनंद होत असे. आणि मुलींनी लवकर भाकरी करायला शिकावं या पलीकडे कधी त्यांच्या अपेक्षा गेल्या नाहीत! त्यामुळे ताजीच्या बहिणींसमोर भूप गाऊन दाखवताना मला खूप संकोच वाटायचा. तरी गाणं संपलं की सुमा अज्जी (ताजीची बहीण) मला घट्ट मिठी मारायची!


कधी अज्जीच्या वाड्यातल्या नातेवाईकांकडे जाताना रिक्षातच आमचे तह आणि तडजोडी सुरू व्हायच्या.
"गाणं म्हणशील ना? नाही म्हणत असं म्हणायचं नाही ऐनवेळी"
"नाही"
"हे बघ एकच म्हण. त्यांना तुझं खूप कौतुक आहे."
"नाही"
" असा हट्टीपणा बरा नव्हे! एक म्हण."
"नाही"
मग कधी ऐनवेळी अज्जीची दया येऊन मी एखाद्या गाण्याचं एखादं कडवं म्हणून दाखवायचे. पण त्याआधी अज्जीच्या कौतुकाची गती बघता बाराव्या वर्षी मी एकटीने मैफली रंगवल्या असत्या असं वाटायचं!
पण गाण्यामुळे (किंवा गाण्यात घालवलेल्या वेळामुळे) माझा आवाज सुधारला. आणि तानसेन जरी झाले नसले तरी चांगली कानसेन मात्र झाले.
अज्जीच्या या कौतुक गोळीबाराने माझ्यात व स्नेहात एक छान समजूतदारपणाचा पूल बांधला. ब-याचवेळी आम्ही यावर मिळून तोडगा काढता येतो का ते बघत असू. मग पाहुण्यांसमोर मी "स्नेहा आणि मी मिळून गाणार" अशी घोषणा करायचे.
कधी आम्ही दोघी मिळून नाटक बसवायचो व तेच पाहुण्यांना करून दाखवायचो. कधी स्नेहाने माझ्या हातावर नाजूक काडीने तासभर बसून काढलेली मेंदी मी त्यांना आधीच दाखवायचे.
काही वर्षातच "मोठी माणसं सगळ्यांना एकसारखं वागवत नाहीत" हे सत्य आमच्या लक्षात आले.
पण त्यातूनही नरू मामा आणि मीना मामीने माझे केलेले लाड हे माझ्या नशिबाचे पाळण्यात दिसणारे पाय होते!

Tuesday, June 2, 2009

खाद्ययात्रा

तशा आम्ही मुली खोडसाळ नव्हतो कधीच. म्हणजे कुणाला ढकलणे, चोपणे, वस्तू काढून घेणे वगैरे प्रकार नाही केले कधी. पण काही काही खोड्या मात्र आम्ही हक्कानी करायचो! त्यात अग्रणीय म्हणजे पाठीमागच्या हौदात उतरणे. गच्चीच्या कोप-यात भांडी घासायची जागा होती. त्याला लागूनच एक पाण्याचा हौद होता. आठ-दहा वर्षाच्या असताना तो बरोब्बर आमच्या आकाराचा होता. त्यामुळे आत गेलं की फक्त डोकं वर रहायचं! काही दुपारी आम्ही पूर्ण हौदात घालवल्या आहेत! त्यात जर मामी बाहेर आली तर स्नेहाला ओल्या पाठीवर छान धपाटे मिळायचे. पण त्यामुळे तिचा उत्साह कधीच कमी झाला नाही. दुसरी खोडी म्हणजे चिकू दादाला गोट्यांच्या खेळात विजय मिळवून देणे. हा "विजय" बेइमान असायचा. गोट्यांचा डाव चालू असताना अनभिज्ञ चोर बनणे ही कला मी व स्नेहानी लवकर अवगत केली. मी तो चेहरा अजूनही कस्टमवाल्यांसाठी जपून ठेवलाय. तशी मी काही तस्कर वगैरे नाही हं. पण बॅग उघडायला लावून माझा वेळ जाऊ नये म्हणून मी तो निरागस चेहरा जपून ठेवला आहे!मे महिना म्हणजे पापड बनवायचा मोसम. तिसरी आवडती खोडी म्हणजे ओल्या साबुदाण्याच्या पापड्या खाणे. सकाळी नऊ ला मामी व शेजारणी एकत्रच पापड्या घालायच्या. आम्ही पण मदत करायचो. पण साधारण दुपारी चार वाजता पापड्या वरून पूर्ण कोरड्या व्हायच्या पण आतून अजून ओल्या असायच्या. त्या खायला फार मजा यायची. प्लॅस्टीकच्या कागदावरून हळूच पापडी सोलून तिथेच फरशीवर बसून खायची. मग मामीला कळू नये म्हणून रिकामी जागा अजूबाजूच्या पापड्यांनी भरून टाकायची. सहा वाजेपर्यंत कागदाला मोठ्ठं भोक पडायचं. मग इकडून तिकडून कितीही पापड्या हलवल्या तरी मामीला कळणार हे निश्चित व्हायचं. मग आता मार खायचाच आहे तर अजून थोड्या खाऊ म्हणून शेवटली पंधरा मिनिटं भरपेट ओल्या पापड्या खायचो! तसंच वाळत घातलेल्या चिंचा, आवळे, उडदाच्या पापडाच्या लाट्या, मुरत ठेवलेलं कैरीचं लोणचं असे अनेक निषिद्ध पदार्थ आम्ही हडप केले आहेत. मे महिन्याची सुट्टी संपेतोवर आमचे दात कायम "कैरीचे" असायचे. हा शब्द-प्रयोग कदाचित मी शोधून काढला असेल. दिवसभर कैरी खाल्ली असेल तर दात कुर-कुर आवाज करतात. तसे आमचे दात सतत कुरकुरायचे. आंबा खाण्यासाठी आम्हाला घरादारापासून वेगळं करण्यात यायचं. दिवसाला प्रत्येकी फक्त एक अख्खा आंबा आणि जेवताना आमरस असं "रेशन" असायचं. त्यातही आंबा खाण्यासाठी वेगळे पेटिकोट ठेवण्यात आले होते. मग आंबा आणि आम्ही गॅलरीत जायचो. मामी आतून कडी लावून घ्यायची आणि "झालं की सांगा" असां वेगळीकडे देण्यात येणारा हुकूम देऊन जायची. मग काय! गाल, कोपरं,गुडघे, नखं सगळं आंबामय व्हायचं. कोय चाटून पांढरी होईतो आमचा आंबा-प्रकार चालायचा. मग हात, पाय, नाक, जे जे म्हणून चाटता येईल ते चाटायचो. सगळ्यात शेवटी एकमेकींची कोपरं! मग "आई झालं" अशी आरोळी! त्यानंतर मामी आम्हाला अंघोळ घालायची! तरीही आमच्या केसांना, नखांना आमरसाचा वास यायचा! तशी आमची खाद्ययात्रा खूप मोठी होती. स्वैपाकघरात थोडा आत्मविश्वास आल्यावर आम्ही दुपारी चोरून मॅगी करायचो. हा शेवईप्रधान प्रकार मामीच्या "निषिद्ध" यादीत नसला तरी मामीच्या परवानगीशिवाय त्याचा वापर करता यायचा नाही. मग ती झोपली की आम्ही ओट्यावर चढून मॅगी बनवायचो! ती उठायच्या आत भांडी घासून, ताटल्या पुसून काही झालंच नाही असे चेहरे करून बसायचो. अज्जी मात्र दुपारच्या खादडीला पूर्ण पाठिंबा देत असे. मुगाचे लाडू, रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू असे कितीतरी प्रकार ती स्वत: करायची. मग बाहेरून कधी चुरमु-याचे लाडू आणायची. त्यामुळे भूक आणि अज्जी यांचा खूप जवळचा संबंध असायचा. शनिवारी मामा बॅंकेतून लवकर यायचा. मग त्याच्या व्हेस्पावर बसून आम्ही दोघी खासबागेत मिसळ खायला जायचो. स्टीलच्या जरा उथळच ताटलीत तर्ररी असलेला झणझणीत मटकीचा रस्सा! त्यावर फरसाणाचा हात व बारीक चिरलेला कांदा! या सगळ्यावर छान लिंबू पिळायचं आणि मग पुढली पंधरा मिनिटं फक्त पाव आणि "कटाचा" समतोल साधण्यात जायची. "सूं सूं " आवाज करत मिसळ खायची आणि नंतर "मेवाड" नावाचं आईस्क्रीम!! येता येता आमचा अंबाबाबाईला पण दंडवत घालून यायचो. नरूमामाला प्रत्येक रस्त्यात कुणीतरी ओळखीचं भेटायचं. नुसतं स्कूटरवरून जाताना सुद्धा त्याला सोनिया गांधी सारखा हात करत जावं लागायचं. त्यामुळे आमची वरात खूप वेळा भर रस्त्यात कुणीतरी भेटलं की अडकायची! मग नेहमीचं , "अगं बाई! ही वसूची होय! किती मोठी झाली?" ही वाक्य असायची. या असल्या निरूपयोगी वाक्यांचा मला खूप राग यायचा. "मागे पाहिलं होतं तेव्हा एवढीशी होतीस!" मग तुम्ही पाहिलं नाही म्हणून मी वाढायचं थांबू का? "आईसारखी दिसत नाही अजिबात! बाबांकडे गेली आहे वाटतं"माझ्या बाबांना मिशा आहेत! आणि त्यांचं नाक खूप मोठं आहे! डोळे तपासून घ्या! असले शेरे ऐकून फार कंटाळा यायचा. नरू मामा मात्र "तांदळाचे भाव" ते "नरसिंह अण्णा पाटील" असल्या सगळ्या विषयावर आनंदाने टिप्पणी करत पुढे जायचा. पण पोटात मिसळ आणी आईस्क्रीम असल्यामुळे असले उशीर माफ व्हायचे!