Thursday, October 15, 2009

आईमधला बाबा आणि बाबामधली आई

गेले दोन दिवस मी अाजारी आहे. आजारपणात साधारणपणे आईची आठवण येते सगळ्यांना, पण मला मात्र बाबाची आठवण येते. बाबानी माझी बरीच आजारपणं काढली आहेत. दवाखान्यात नेणे, अौषध देणे, अाल्याचा चहा करून देणे हे सगळे 'आई गुण' माझ्या बाबामध्ये आहेत!
आजाराच्या बाबतीत मी लहानपणापासूनच दुर्दैवी आहे. म्हणजे मी सारखी आजारग्रस्त असते असं नाही. पण मला नेमक्या वेळी आजारी पडता यायचे नाही. शाळा सुरू झाली की मी ठणठणीत असायचे. पण सुट्टीत मला नेहमी काहीतरी व्हायचं. शाळेतून सुट्टी मिळण्यासाठी सर्दी ही एकच व्याधी मला लाभली होती. माझ्या सर्दीचा कधी ब्रॉन्कायटीस झाला नाही ,निदान शाळेत असताना तरी. किंवा सर्दी एकदम तिस-या टप्प्यावर जाऊन दोन महिने सक्त आराम असं भाग्य पण मला लाभलं नाही. आमच्या शाळेतल्या कित्येक सदैव शेंबड्या पोरांना टॉन्सिलायटीस झाला होता. त्यांना शस्त्रक्रिया करावी लागे. आणि त्यानंतर म्हणे पथ्य म्हणून त्यांना आईस्क्रीम खायला देत असत. ही सगळी शेंबडी मुलं मी माझ्या कट्टर शत्रूंमध्ये सामील केली. दोन महिने शाळा नाही या एकाच कारणानी त्यांचा मत्सर वाटणे योग्य आहे. पण त्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून त्यांच्या पुत्र/पुत्रीव्रता आया माझ्या घरी रोज संध्याकाळी त्यांच्या वह्या पूर्ण करायला येत असत. ते बघून मला माझ्या आईला, "शिका जरा!" असं म्हणावसं वाटत असे. शाळेच्या बाबतीत माझा बाबा माझी आई होता. माझ्या आईने माझ्या शाळेचं तोंड खूप कमी वेळा पाहिलं. मी पहिली-दुसरीत असताना शाळेत खूप प्रसिद्ध होते. कारण मी खूप छान नाच करायचे. शाळेच्या गॅदरिंगमध्ये नेहमी माझा खास एकटीचा नाच असायचा किंवा एखाद्या मोठ्या नाचातला महत्वाचा भाग मला मिळायचा. मी अभ्यासातसुद्धा काही वाईट नव्हते. त्यामुळे मुलामुलींच्या आयांमध्ये माझ्याबद्दल नेहमी चर्चा होत असे. त्यात एकदा कुठल्यातरी रिकामटेकड्या आईने, "सईला आई नाहीये", अशी अफवा उठवली होती. कारण सरळ आहे! रोज शाळा सुटली की बाहेर गेटात लूना, कायनेटिक, एम-एटी घेऊन आलेल्या आयांच्या घोळक्यात माझा बाबा उभा असे! पालकसभेत परत बायकांत पुरूष लांबोडा असलेला माझा बाबाच असायचा. माझ्या शाळेतल्या प्रगतीपुस्तकावर सहीसुद्धा बाबाचीच असायची. एवढंच नाही तर माझा बाबा माझ्या शाळेतल्या बाईंना ,"मुलांचा अभ्यास कसा घ्यावा", यावर फुकट सल्ला पण द्यायचा. जेव्हा माझ्या आईला ही अफवा समजली तेव्हा माझ्या शाळा-आयुष्याबद्दल सहिष्णुता दाखवायला एक दिवस ती सुट्टी घेऊन मला घ्यायला आली.
बाबा माझ्या अभ्यासावर खूप बारीक लक्ष ठेवायचा. मी परीक्षा देऊन आले की मला तो सगळी प्रश्नपत्रिका मी कशी कशी सोडवली ते विचारायचा. "हं इथे काय केलंस? याचं उत्तर काय आलं?" असले भयावह प्रश्न विचारायचा. खरं तर मला पेपर सगळा तसाचा तसा आठवायचा पण मी उगीच विसराळूपणाचा आव आणून त्याला निम्मी उत्तरं द्यायचेच नाही. पण माझ्या एकूण वागण्याचा अभ्यास करून आणि मी दिलेल्या उत्तरांवरून तो आधीच मला किती मार्क मिळतील ते शोधून काढायचा! मला मूळ परीक्षेपेक्षा ही सत्त्वपरीक्षा जास्त भीतीदायक वाटायची! विशेषत: वार्षिक परीक्षेनंतर या असल्या उलटतपासण्या मला बिलकुल आवडायच्या नाहीत. पण ह्या सगळ्यातून गेलं की बाबातला बाबा पुन्हा समोर यायचा आणि मला बर्फाचा गोळा खायला घेऊन जायचा.
आईनी बाबासारखा माझा अभ्यास घ्यावा ही माझी लहानपणीची इच्छा होती. पण रसायनशास्त्रात पी.एच.डी असलेल्या माझ्या आईने कधीही माझ्या केमिस्ट्रीच्या पुस्तकाला हात सुद्धा लावला नाही. तिनी मला नंतर स्वयंपाकघरात केमिस्ट्रीचे धडे दिले. जसं की, "अळूची भाजी करताना आधी अळूचा पी.एच. नियंत्रित करणे गरजेचे आहे! म्हणून त्यात ताक किंवा चिंच घालायची." कोबी, ढोबळी मिरची, वांगी असल्या भाज्यांमध्ये बदाबदा पाणी घालून त्याची चव बिघडवणा-या बायका आईला अजिबात आवडत नाहीत. आमच्या घरातले स्वयंपाकघर ही आईची घरातली लॅबोरेटरी आहे. तिथे बनणा-या प्रत्येक पदार्थाला जसं बनवलं आहे त्यासाठी ठराविक कारणे असतात. उगीच कुणी सांगितलं म्हणून केसकर मॅडम तसंच्या तसं करीत नाहीत! तसंच स्वयंपाक करणे म्हणजे फक्त चांगले पदार्थ बनवणे नव्हे तर 'प्रयोग' संपल्यावर ओटा किती साफ आहे यावरसुद्धा माझे मार्क अवलंबून असायचे. पहिल्या काही धड्यांमध्ये मला आईने स्वयंपाकातील मूळ क्रिया (अभियांत्रिकी शब्दात युनिट ऑपरेशनस्) शिकवल्या. त्यानंतर मला स्वयंपाकघरात मुक्त विहार दिला. त्यामुळे पहिल्या काही वर्षांत बिचा-या बाबाला माझे असे अनेक स्वैर प्रयोग खावे लागले. मग कधी कधी आई ऑफिसात असताना मी घरी रूचिरा उघडायचे. एक दिवस यात मठ्ठा करायची रेसिपी मी उघडली. त्यात, "ताकाला आलं लावा" असं वाक्य होतं. आता ताकाला आलं कसं लावणार? आलं काय रंग आहे जो ताकाच्या गालावर लावता येईल? मग मी आईला फोन करून ही समस्या विचारली. तेव्हा हसून हसून तिची पुरेवाट झाली.तसंच पिठात मोहन घालणे म्हणजे काय हेसुद्धा मला कोडं होतं. हा कोण मोहन? आणि त्याला बिचा-याला पिठात का घालावं कुणी? पण मोहन म्हणजे गरम तेल हे कळल्यावर मला असले शब्द वापरून मला कोड्यात टाकणा-या रूचिरावालीचा खूप राग आला होता. त्यामुळे मी आई हे एकच दैवत मानलं आणि सगळा स्वयंपाक तिच्याकडूनच शिकले. आता तिच्यासारखीच मीही एखादी गोष्ट आवडली की ती स्वत:च करायचा प्रयत्न करते. पण यातही खूप संशोधन आहे जे करायला मला मजा येते!

अजूनही फोनवर नेहमी तिचा स्वयंपाकासाठीच सल्ला घेतला जातो. फोन ठेवताना मात्र नेहमी, "सई तू रसायनशास्रात पी.एच.डी करते आहेस हे लक्षात आहे ना?" असा टोमणावजा प्रश्न ती विचारते.
आईमधली ही शिक्षिका जेव्हा मला दिसली तेव्हा मला त्या लूनावाल्या काळजी करणा-या आयांपेक्षा ती खूप जास्त आवडली. पण माझी आणि आईची स्वयंपाकघरातली गट्टी जमल्यावर काही वर्षं बाबाला त्याच्या तेथील अस्तित्त्वास मुकावं लागलं. पण अजूनही बाबानी सकाळच्या चहाचा आणि गुबगुबीत ऑमलेटचा मान सोडला नाहीये!
आईमधले खूप गुण मला 'बाबा गुण' वाटायचे. जसं की ती कधीही मला खोटी आशा दाखवायची नाही. मायेपोटी मला कधीही खोटं सांगायची नाही. शाळेतून बाहेर पडल्यावर माझ्या लक्षात आलं की इतर मैत्रिणींपेक्षा माझं वजन जास्त होतं. त्यामुळे त्यांना जसे कपडे घालता यायचे तसे मला यायचे नाहीत. याचा मला खूप त्रास झाला, पण आईने मला अगदी परखडपणे यातून बाहेर यायचा मार्ग सांगितला. तिच्या भाषेत "लाकडाच्या जाडजूड ओंडक्यापासूनच सुंदर शिल्प तयार होतं. त्यामुळे तू शिल्प कुठे आहेस आणि ओंडका कुठे हे तुझे तूच शोधून काढ!". आईचा हा सल्ला मानून मी सोळा -सतराव्या वर्षीच व्यायाम करायला सुरवात केली. त्याबरोबरच रोजचा आहार माझ्या प्रकृतीप्रमाणे बदलावा लागला. मग 'नाइलाजाने' का होईना, मी बाहेर जाऊन तेलकट पदार्थ खाणं बंद केलं. तसंच घरीसुद्धा फळं, भाज्या आणि वेगवेगळ्या कोशिंबीरी करायला शिकले! हे सगळं संतुलन साधून मला शिल्प बनायला चांगली दहा वर्ष लागली! पण दहा वर्षांनी मला माझ्यातल्या शिल्पापेक्षा माझ्या आईतल्या शिल्पकाराची जास्त जाणीव होते!
बाबानी मला शिस्त लावली. जो माझ्या मते 'आई गुण' आहे. सकाळी सहा वाजता उठणे, नियमित नाचाच्या क्लासला जाणे, नियमित अभ्यास करणे, हिशोब ठेवणे (जे मी कधीही नीट केले नाही) या सगळ्या गोष्टींमध्ये मला बाबामधली आई दिसली. आईने मला प्रयोग करायला शिकवले, नापास व्हायला शिकवले आणि नेहमी मी ख-या जगात कुठे आहे याची जाणीव करून दिली. यात मला आईतला बाबा दिसला.
पण आई आणि बाबा या जरी दोन वेगळ्या व्यक्ती असल्या तरी या दोन वृत्तीदेखील आहेत. आणि माझ्या आई-बाबांमध्ये या दोन्ही वृत्ती रसायनशास्त्रात दोन्ही बाजूला बाण काढून दाखवलेल्या संतुलनाप्रमाणे आहेत!
त्यामुळे ही गोष्ट आईतल्या बाबासाठी आणि बाबातल्या आईसाठी!

14 comments:

  1. मस्त लिहीलयेस सई...कदाचित माझे आई-बाबा ही अगदी असेच असल्यामुळे जास्त भावलं ते....ते परिक्षेहून घरी आल्यावर पेपरबद्दल विचारणे माझे बाबा सेम टू सेम असेच....ते त्या पेपर्सवर अंदाजे मार्क्सही लिहायचे....
    आई अशीच तुझ्या आईसारखी, लहानपणी मला ईतरांच्या आयांना पाहून हेवा वाटायचा, पण आता माझीच आई आवडते जी मला आताही शिक्षण वाया घालवत घरी बसल्याबद्दल ओरडत असते....मुलांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवणाऱ्या या आयांसारखेच आपल्यालाही व्हायचे आहे हे मी स्वत:ला बजावत असते!!!!तरच पी एच बॅलन्स होईल नाही का!!!
    Tanvi

    ReplyDelete
  2. chaanach lihilaM aahes ... maajhee aai paN padaarthaacyaa chavee itakech marks otaa kiti swacch aahe, gas kiti vaaparalaa yaalaa dyaayachi.

    ReplyDelete
  3. अग सई किती निरागस आणि छान लिहितेस तू! 'उन्हाळ्याच्या सुट्टीवरचे' तुझे सगळे लेख वाचले मी. मजा आली वाचताना. अस वाटल जणू हे सगळं वाचत असताना मीसुद्धा या लेखांमधल्या पात्रांच्या आसपासच होते कुठेतरी..

    ReplyDelete
  4. मस्त लिहिलं आहेस सई, खूप आवडलं.

    ReplyDelete
  5. .तसंच पिठात मोहन घालणे म्हणजे काय हेसुद्धा मला कोडं होतं. हा कोण मोहन? आणि त्याला बिचा-याला पिठात का घालावं कुणी?>> agadi agadi..
    khup Chhan lihilays :)

    ReplyDelete
  6. केवळ अप्रतिम. बाबाला बर्‍याचदा गृहीत धरले जाते. लेखाने बाबाच्याही अस्तित्वाची जाणीव करून दिली :)

    ReplyDelete
  7. अतिशय मस्त.
    तु रसायनशास्त्रात पीचडी करतेयस, मला तर वाटलं साहित्यात.

    तुझे लेख प्रसन्न्ता आणतात, कंटाळलेल्या वेळी. Thanks.

    तुझ्या लेखांवर तुझ्या बाबांची छान प्रतिक्रिया वाचायला मिळते बर्‍याचवेळा. आईलाही सांग लिहायला.

    ReplyDelete
  8. Too late in replying to this thread and there are too many comments now. :(
    Thanks a lot for the appreciation. :)
    Cheers
    Saee

    ReplyDelete
  9. सई,

    तुला व तुझ्या कुटुंबियांना ही दिपावली सुख, समृद्धी, अन् समाधानाची जावो :)

    आईमधला बाबा इज टू गुड :) मोहन म्हणजे गरम तेल हे समजलं "ताकाला आलं लावा" लोल.. पण आलं लावणं म्हणजे नक्की काय?

    रसायनशास्रात पी.एच.डी करत्येस?? वॉव :) हाहाहा सई तू शिल्प आहेस होय? ;) नेहमीप्रमाणेच छान लिहिलेस हे सांगणे आता काय गरजेचे नाही

    ReplyDelete
  10. सयी खूप छान लीहिले आहेस. विनोदी पण तेवढेच हळ्वे. मजा आली खूप वाचताना.
    -गेन्धाली

    ReplyDelete
  11. खुप छान सई. माझ्या कडे पण आई मधला बाबा आणि बाबा मधली आई आहे. आणि आई पण रसायनशात्रात पदवीधर आहे. परवची गोश्ट, माझ्या ११ महिन्याच्या मुलीला जुलाब झाले, तर आई म्हणे तीला जास्त भाज्या देउ नकोस, त्यात Cellulose आहे आणि ते पचायला अवघड आहे. बाबा मधली आई पण खुप आवडली.

    ReplyDelete