Sunday, October 25, 2009

भातुकली


आई, मला एक पुरी दे ना गं लाटायला!"
"सई, पायात येऊ नकोस माझ्या, पाहुणे येतील आता, त्यात तुझी लुडबूड नको आणि!"
"पण मी एकच पुरी लाटीन! तुझी शप्पथ!!"
"नंतर. एक दिवस सगळा स्वयंपाक तुला देईन. तेव्हा सगळं तूच कर."
"कधी?"
"लवकरच."

आणि माझी आई वचनाची पक्की आहे हे तिनी मला मी पाच वर्षाची असतानाच दाखवून दिलं! एका मे महिन्यात स्नेहा पुण्याला आली होती. तेव्हा माझ्या आईनी माझ्या सगळ्या मैत्रिणींना आमच्या घरी "खरी खरी भातुकली" खेळायला यायचं आमंत्रण दिलं! माझी शाळेतली घट्ट मैत्रीण पूजा, माझ्या नाचाच्या क्लासमधली सखी आसावरी, आईच्या मैत्रिणींच्या मुली, माझी मावस-चुलत बहीण लीलावती आणि माझी लाडकी स्नेहा अशी पलटण जमा झाली. आई-बाबा दोघेही या खेळात मॅनेजरची भूमिका सांभाळत होते. आणि ताजी तिच्या नेहमीच्या मजेदार थाटात पर्यवेक्षिकेचं काम करत होती. बाबाला सकाळी सकाळी भाजी आणायला फुले मंडईत पाठवण्यात आले. आमच्या उद्योग बंगल्याच्या बैठकीच्या खोलीत भातुकली कार्यक्रम ठेवला होता. मग दोन-तीन स्टोव्ह, आणि गॅसची शेगडी बाहेरच्या खोलीत जमिनीवरच मांडली आमची उंची लक्षात घेऊन. आगीचं काम मात्र सगळं आईकडे आणि विमलमावशीकडे होतं. त्या बोलीवरच माझी भातुकली सुरू झाली होती. आणि सगळ्या मुलींना सुती कपडे घालून यायचा आदेश होता. मुलींच्या आयांना आमंत्रण नव्हतं कारण मग आम्हांला काहीच करायला मिळालं नसतं. तसंच मुलींच्या बाबांनाही आमंत्रण नव्हतं कारण मग आम्हाला काहीच खायला मिळालं नसतं! मग नऊच्या आसपास मुली येऊ लागल्या. आम्हाला मधेच भूक लागू नये म्हणून सगळ्यांना आल्या आल्या पोहे खायला मिळाले.
पुरी, बटाट्याची सुकी भाजी, मटकीचा रस्सा, काकडीची कोशिंबीर आणि श्रीखंड असा बेत होता. मग सगळ्या मुलींना आधी बटाटे उकडायचं काम मिळालं. जशी जशी गर्दी वाढली तशी कामं पण वाटून देण्यात आली. मी आणि आसावरीने बटाट्यांच्या भवितव्याची जबाबदारी उचलली. स्नेहाला आणि मला वेगळ्या वेगळ्या गटात मुद्दाम टाकण्यात आलं होतं. बाबा श्रीखंड गटात सामील झाला. बाबाला डायबेटिस आहे. त्यामुळे तो नेहमी श्रीखंड गटाकडेच आकर्षित होतो. गेल्या काही वर्षांत बाबानी "ईक्वल श्रीखंड" या अभूतपूर्व डायबेटिक श्रीखंडाचा शोध लावून ते बनवण्यात प्राविण्य मिळवलं आहे! आई आणि विमल मावशी पुरी गटाचं नेतृत्व करत होत्या. स्नेहाला (अर्थातच) कणीक मळायचं काम मिळालं होतं. तिच्या पाचवीला बहुधा कणीक पुजली गेली असावी चुकून. वयाच्या पाचव्या वर्षी ही कामं करायला मिळणं म्हणजे मला आणि माझ्या मैत्रिणींना, "अजिं म्यां ब्रम्ह पाहिले" सारखं होतं. बटाटे कुकरमध्ये उकडतात, त्यांना गार व्हायला बराच वेळ लागतो, आणि गार न झालेला बटाटा सोलायचा प्रयत्न केला तर हाताला चांगला चटका बसतो, अशा खूप गोष्टी त्या दिवशी आम्हांला समजल्या. फोडणी कशी घालतात याचं आमच्या डोळ्यादेखत झालेलं प्रात्यक्षिक बघून नेहमी आम्हांला ऐकू येणा-या चुरचुरीत आवाजाचं रूप बघायला मिळालं! त्यात आईतली शास्त्रज्ञ या सगळ्या गोष्टी जमेल तितक्या सोप्या करून सांगत होती. आणि या भातुकलीत फक्त मुलीच सामील झाल्या नव्हत्या. चिकूदादा बाबाबरोबर आधुनिक पुरूषांचं प्रतिनिधित्व करत होता! त्याने पुरी गटात मौल्यवान भर टाकली आणि तळून झालेल्या पु-या पंगतीपर्यंत न खाता आमच्या भातुकलीला मोलाचे सहाय्यही केले!
मग काही मुली हळूबाईपणा करू लागल्या की आई त्यांना, "चला आटपा, बारा वाजता पंगत बसणार आहे. उशीर केलात तर तुमचा पदार्थ वाढला नाही जाणार!" असं म्हणून स्पर्धा सुरू करायची. मग खोलीतल्या एका कोप-यात आमचे बटाटे चरचरीत तेलाच्या आणि खरपूस कांद्याच्या फोडणीत पडले. त्याचवेळी खोलीच्या दुस-या टोकाला विमलमावशीच्या देखरेखीखाली मटकीचा रस्साही उदयाला आला. खोलीभर पसरलेल्या घमघमाटामुळे पोरींच्या पोटात कावळे ओरडू लागले. त्या उत्तेजनानीच की काय पुरी गटाचे हात पोळपाटावर गर गर फिरू लागले. पुरी गटाने वाटीचा साचा बनवून मोठ्या पोळीच्या पु-या केल्या होत्या. आणि आई आणि ताजी एकावेळी एका पोळीपासून तयार झालेल्या सगळ्या पु-या तळत होत्या. कोशिंबीर गट त्यांचे काम संपवून इकडे तिकडे नाक खुपसू लागला त्यामुळे त्या गटातल्या मुलींना इतर गटात विलीन करण्यात आले. खोलीच्या मधोमध बाबा आणि त्याचा पूर्ण गट हाऽऽ पसारा मांडून बसला होता. त्यामुळे आई सारखी, "हातासरशी पसारा आवरा" असा संदेश खास त्या गटाच्या पसा-याकडे बघून देत होती. त्याचा बाबावर काहीही परिणाम होत नव्हता. हे असं आमच्याकडे त्यानंतरची सगळी वर्षं चालत आलेलं आहे. श्रीखंड गटानी मात्र काम चोख केलं होतं. चक्का आणि साखर मिसळून तयार होती. त्यात भिजवलेले पिस्ते, काजू, बदाम आणि दुधात केशर घालून तयार केलेला रंग जाऊ लागला होता. सगळ्या गटांची चोरटी नजर श्रीखंड गटाकडे जात होती. सबंध खोलीच्या प्रत्येक कोप-यात आमचे पदार्थ नावारूपाला येत होते. त्यामुळे मिळून केलेल्या या जेवणाकडे सगळ्या मुलींचे डोळे लागले होते.

मग साडेअकराच्या आसपास पसारा आवरायची सूचना झाली. आम्ही भरभर आमच्या भाजीवर "भुरभुरायला" लागणारं खोबरं-कोथिंबीर मिश्रण तयार केलं. मग दोन मुलींनी केरसुणी घेऊन खोली झाडली, दोघींनी फरशी पुसली, उरलेल्या काहींनी ताटं, वाट्या, पेले, चमचे मांडले. खोलीच्या चारही भिंतींना लागून सतरंज्या घालण्यात आल्या आणि सगळ्या मुलींनी त्यांच्या भातुकलीचा आस्वाद घेतला. सगळ्यांचेच पदार्थ छान झाले होते. आणि का कोण जाणे आमचा स्वयंपाक अगदी आईच्या स्वयंपाकासारखा लागत होता!
मनसोक्त श्रीखंड-पुरी खाऊन परत बाबानी आणलेलं कॅन्डी आईस्क्रीमही आम्ही खाल्लं! दुपारी पोटोबा भरल्यावर आमचं फोटोसेशनसुद्धा झालं! बाबानी पाठवलेला हा एक फोटो सुद्धा माझ्याकडे आहे! त्यात सगळ्यांचे ओठ आईस्क्रीममुळे केशरी झाले आहेत! आसावरीच्या गो-या रूपावर तो रंग खूप गोड दिसत होता!

लहानपणी मी साधारण पाच वर्षाची झाल्यावर आईकडच्या मावश्या आणि बाबाकडच्या खाष्ट आत्या नेहमी, "सई मोठी झाली. आता अजून एक भावंड 'झालं पाहिजे'" असा सल्ला द्यायच्या. त्यावर बाबा, "नाही! आम्हांला एकच पुरे आहे." असं सांगायचा. त्यानंतर त्यांचे चेहरे बघायला मला आणि बाबालाही खूप मजा यायची. आई-बाबाच्या या "एकच मुलगी" प्रयोगावर खूप टीका झाली होती. कदाचित त्यामुळेच आई-बाबानी माझ्या लहानपणात मला इतर लोकांबरोबर मिळून करण्यासारखं खूप काही आहे हे सांगायचा इतका प्रयत्न केला!
माझ्या शिशुगटाच्या प्रवेशाच्या मुलाखतीत मला, "तुझ्या घरी कोण कोण असतं?" असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मी, "चित्रे आजोबा, दौलत मामा, विमलमावशी, तिचा मुलगा योगेश, चित्रे अज्जी, संध्या ताई" आशी लांबलचक यादी दिली होती. त्यात आई बाबांचं नाव अगदी शेवटी आलं होतं! माझ्या आईला अजून त्या गोष्टीचं वाईट वाटतं! पण भावंड नसल्यामुळे लहानपणापासूनच सगळ्यांशी मैत्री करायची सवय मला लागली. पुढे शाळेत गेल्यावर मला माझ्यासारख्याच खूप "एकुलत्या एक मुली" भेटल्या. आणि त्यांच्यातच मला माझ्या नसलेल्या सगळ्या बहिणी मिळाल्या.
पण आई बाबाच्या या खेळकर उपक्रमामुळे मला त्या दोघांमध्ये माझे सगळ्यात जवळचे मित्र मिळाले!

11 comments:

  1. मस्त झालीय सई ही भातूकली....लहानपणाच्या भातूकलीची आठवण झाली.....मुलांसाठी करेन आता एकदा, तिच भातूकली आईच्या भूमिकेतून पहाताना कशी वाटते याचा अनुभव घेते आता.
    बाकी तुझे आई-बाबा तुझे मित्र आहेत हे तुझ्या लेखातून नेहेमीच जाणवते....

    ReplyDelete
  2. मुलींच्या बाबांनाही आमंत्रण नव्हतं कारण मग आम्हाला काहीच खायला मिळालं नसतं! chan zamaliay bhatukali....

    ReplyDelete
  3. सये भातुकलीच्या फोटोतली तू कशी काय ओळखायची? आय विल ट्राय.. तुझ्या आईच्या उजवीकडच्या (आसावरीच्या) मुलीच्या मागची मुलगी म्हणजे तू ना? की डावीकडची? हीहाहा

    तुझ्या पोस्टवरून सध्या कोल्हापुरातून बाहेर पडून पुण्यात रोख आलेला दिसतोय असो चांगलय हे ही पोस्ट पण जरा अजून कोल्हापुरच्या गमती जमती लिही ना प्लीज. अवचटांची / हतवळणकरांची एखादी कथा वाचतोय असा फील आला मला अगदी :))))

    ReplyDelete
  4. Aparna and Tanvi,
    Thanks!!
    Deep,
    Are ho ki! Label karayla wisarle!!!
    From L to R
    (Last row) Sneha and Taji
    (middle row) Me and Pooja
    (Front row) Manasi Aai and Asawari. :)
    I am the one who looks a little bit bored. :(
    Saee

    ReplyDelete
  5. मस्तं झालीए भातुकली..
    माझ्या शिशुगटाच्या प्रवेशाच्या मुलाखतीत मला, "तुझ्या घरी कोण कोण असतं?" असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मी, "चित्रे आजोबा, दौलत मामा, विमलमावशी, तिचा मुलगा योगेश, चित्रे अज्जी, संध्या ताई" आशी लांबलचक यादी दिली होती. >> हे खुप आवडलं..
    अशीच लिहीत रहा...

    ReplyDelete
  6. भातुकली ची तर सौ. ला पण खुप आवड. मला दोन्ही मुलीच. जेंव्हा दोघी पण लहान होत्या तेंव्हा एकदा बाहुलीचं लग्नं केलं होतं. ते आठवलं. बाहुल्याचं नांव होतं अरमान, आणि बाहुली जस्सी. बाहुली होती आमच्या रसिकाची, आणि बाहुला होता माझ्या भाचीचा गौतमीचा. लग्न नाशिकला झालं, शेवटी गौतमी म्हणे आता बाहुली ठेउन जा मुंबईला तु परत. तिचं लग्नं झालंय.. मजा नुसती. खुप खाण पिणं झालं होतं..
    असो.. ही कॉमेंट पोस्ट करु नका, जस्ट शेअर करावसं वाटलं म्हणुन लिहितोय.

    ReplyDelete
  7. Hmmm gr8 pic :) u do not look like a bored its a look a look with attitude ;)Aai chya shejaarchee mansi(?) kitti cute distye hi..(just like my sis :D :D)
    mala vatle ki tu asawarichya maagchee mulgee aahes!

    ReplyDelete
  8. Reminds me of my "Scout" days....we "all boys gang" appeared for "Cooking" badge exam. We were trying to cook by burning wood and coals on the terrace of our school. I am sure that examiners awarded us the badge just for our adventures attempt at cooking and not for the food because they did not bother to taste our food !!! (I am sure they were convinced that we will never die of hunger. Someone will take pity at us and surely feed us if we attempt to cook on our own.)

    ReplyDelete
  9. @Mugdha Thanks. :)
    @Mahendra Snehachya bahulicha ani mazya bahulyacha lagna suddha zala hota! We had a big fight when I decided to take her bahuli away!!
    @Deep
    Everyone says the same things about me. :( I just look like I have attitude..but I am very humble. :P
    @Shrirang
    Your batch should have had a ruler like my mom!! :)
    Thanks for all your comments
    Cheers
    Saee

    ReplyDelete
  10. Hmmm woke ;) who says atti. is bad? it is good everyon may not carry it with grace. & u look humble in this pic :))))))))))))))))))))

    ReplyDelete
  11. खूप उशीर झाला प्रतिक्रिया लिहायला.घरातल्या कामा मूळ घर अस्त्यावस्त झालय़!.
    निलेश असलेला फोटो मी पाठ्वला नाही का?
    पोस्ट नेहमी प्रमाणे छान आहे

    ReplyDelete